कागल :येथील श्री छ. शाहू सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम 2022-23 मध्ये गळीतास येणाऱ्या उसासाठी एक रकमी एफ.आर.पी प्रति टन रुपये 3000/- देणार असल्याची माहिती कारखान्याच्या श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
पत्रकात पुढे म्हटले आहे, सहकारातील आदर्श स्व.राजे विक्रमसिंह घाटगे संस्थापक असलेला हा कारखाना ऊस दराबाबत नेहमीच आघाडीवर राहिलेला आहे. शेतकऱ्यांनी पिकविलेल्या उसास चांगला दर मिळालाच पाहिजे या भूमिकेशी शाहू नेहमीच ठाम राहिला आहे. चांगला ऊस दर देण्याबरोबर राष्ट्रीय व राज्य पातळीवरील बक्षीस मिळवण्याची परंपरा असो,किंवा उच्चांकी गळीत, उच्चाकी साखर उत्पादन असो,अशा सर्वच बाबतीत स्वतःचे विक्रम मोडत शाहू कारखान्याने सहकारातील आपली यशस्वी घोडदौड चालू ठेवली आहे.
हंगाम 2022 -23 साठी या कारखान्याने 11 लाख मे.टन गळीताचे उद्दिष्ट निश्चित केले असून ते पूर्ण करण्यासाठी सभासद, ऊस पुरवठादार यांनी आपला नोंद केलेला संपूर्ण उस कारखान्यास पाठवून सहकार्य करावे अशी विनंती वजा आवाहनही प्रसिद्धि पत्रकातून केले आहे.
यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे , संचालक डॉ. डी एस पाटील, बॉबी माने,प्रा. सुनील मगदूम शिवाजीराव पाटील ,यांच्यासह कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण उपस्थित होते.