बांधकाम विभागात मार्फत शेतकऱ्यांना नोटीसा
कागल : बहुचर्चित कागल शहराच्या विकास आराखड्याला शेतकऱ्यांनी आक्षेप घेऊन हरकती दाखल केल्यानंतर या हरकतींची सुनावणी तज्ञांच्या उपस्थितीमध्ये केली जाणार आहे. एकूण 324 हरकतीची सुनावणी दि. 23 ते 25 मे पर्यंत नगरपालिकेच्या सभागृहात होणार आहे. पहिल्या दिवशी 110, दुसऱ्या दिवशी 110 व तिसऱ्या दिवशी 114 हरकतदारांच्या सुनावणी होणार आहेत. या हरकतदारांना वेगवेगळ्या तारखा देण्यात आले आहेत. या सुनावणीची तयारी बांधकाम विभागाकडून करण्यात आली आहे. सर्व हरकतदार शेतकऱ्यांना उपस्थित राहण्याबाबत नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
शहराचा वाढता व्याप लक्षात घेता दर दहा वर्षांनी होणारा शहर विकास आराखडा यंदा करण्यात आला. रस्ते, पार्किंग, बगीचा, स्मशानभूमीची आरक्षणे मोठ्या प्रमाणात टाकली जाणारी आहेत. मात्र या विकास आराखड्याला सुरवातीपासूनच नागरिकांमधून विरोध झाला. विशेषता या विकासा आराखड्याला शेतकऱ्यांमधून तीव्र आक्षेप घेण्यात आले. शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे. विकास आराखड्यामुळे अनेकांच्या जमिनीचे क्षेत्र संपुष्टात आले आहे. या विकास आराखड्यामुळे काही शेतकरी अल्पभूधारक झाले आहेत, तर काही शेतकरी तर भूमीहीन झाले आहेत. त्यामुळे विकास आराखड्याच्या सुनावणीकडे शेतकरी व नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.
या सुनावणी करता सेवानिवृत्त नगर रचनाकार सर्जेराव सखाराम मुगडे (पुणे), रा. पां. पाटील व वास्तु विशारद डी. वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेजचे आर्किटेक्चर विभागाचे प्रमुख इंद्रजीत जाधव या तज्ञांचा नगरचना पुणे संचालक यांच्याकडून नियुक्त्या करण्यात आले आहे. सुनावणीसाठी उपस्थित राहण्याकरता प्रत्येक हरकतदाराला पोस्टाने नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. सकाळी 11 ते दुपारी १२ त्यानंतर दुपारी १२ ते १ व ३ ते ४ तसेच ४ ते ५ यावेळी मध्ये सुनावणी काम सुरू राहणार आहे.
मुख्याधिकारी श्रीराम पवार, नगर अभियंता सुनील माळी यांनी सुनावणीची रूपरेषा ठरवली आहे. हरकत घेताना बांधकाम विभागाने हरकतदाराकडून भाग नकाशा जोडून घेतल्यामुळे सुनावणीचे काम अधिक सुलभ होणार आहे.