शिवराजमध्ये शाहू महाराजांना अभिवादन
मुरगुड ( शशी दरेकर ) : छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये अत्यंत मोलाची भूमिका बजावली. २० व्या शतकाच्या दोन दशकांमध्ये महाराजांनी परिवर्तनवादी चळवळीला चालना व प्रोत्साहन दिले. आयुष्याची ४८ वर्षे वाट्याला आलेल्या शाहू महाराज यांच्या समाजोद्धाराचे कार्य आजच्यासह पुढील सर्व पिढयांना प्रेरणादायी ठरणारे आहे. असे प्रतिपादन जयश्री ढोले- कुराडे यांनी केले.
येथील जय शिवराय एज्युकेशन सोसायटी संचलित शिवराज विद्यालय, ज्युनिअर कॉलेज व व्होकेशनल विभाग यांच्या वतीने आयोजित राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्ष सांगता सोहळा कार्यक्रमात शाहूंच्या जीवन कार्यावर मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य पी. डी. माने होते.
राजर्षि शाहू महाराज यांच्या समाज सुधारणा, आर्थिक क्रांती, शेती, सहकार, क्रीडा आदी क्षेत्रातील कार्याचा गौरव करून सौ. जयश्री ढोले -कुराडे यांनी शाहूंच्या जीवन चरित्राची उपस्थितांना माहिती दिली.
प्रास्ताविकात उपप्राचार्य रवींद्र शिंदे यांनी शाहूंच्या जीवनकार्याची ओळख करून देऊन प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रात लोकसेवकाची भूमिका ठेवून कामगिरी केल्यास ती शाहूंना खरी आदरांजली ठरेल असे प्रतिपादन केले. ज्येष्ठ शिक्षक शशिकांत सुतार यांनी शाहू महाराजांच्या दलित उद्धारासाठीच्या कार्याची माहिती व महती स्पष्ट केली. यावेळी प्रतिमा पूजन शिक्षकेतर कर्मचारी कृष्णात करडे यांच्या हस्ते करण्यात आले. विजयमाला मंडलिक सांस्कृतिक सभागृहामध्ये झालेल्या या कार्यक्रमावेळी शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा शालोपयोगी साहित्य देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी व्होकेशनल विभाग प्रमुख प्रा. संभाजी आंगज, उपमुख्याध्यापक एस. एच. पाटील, पर्यवेक्षक शिवाजी भाट, ज्येष्ठ शिक्षक प्रा. सुनिल डेळेकर, एस. डी. कांबळे यांच्यासह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी- विद्यार्थिनी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रवीण सूर्यवंशी यांनी केले. आभार प्रा. पी. एस. डवरी यांनी मानले.