मुरगूड ( शशी दरेकर ) – तंबाखू आणि तंबाखूजन्य गुटखा,मावा इ.च्या सेवनाने कॅन्सर रुग्णांचे प्रमाण आपल्या राज्यात,त्यातही पश्चिम महाराष्ट्रात वेगाने वाढत आहे. पूर्वी हे रुग्ण वयाच्या चाळीशी-पन्नाशीनंतर आढळत.सध्या हे प्रमाण तरूण वयात,विशीनंतरच मोठ्या प्रमाणात आढळत आहे. ही अत्यंत चिंतेची गोष्ट आहे. त्यासाठी तंबाखूजन्य पदार्थ सेवनाविरूध्द व्यापक सामाजिक प्रबोधनाची आणि जनजागरण करण्याची गरज आहे. ” असे प्रतिपादन प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ, कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या प्रमुख डॉक्टर रेश्मा पवार यांनी केले.
त्या येथील श्री साईबाबा गणेश तरूण मंडळाच्या रक्तदान शिबीर उदघाटन प्रसंगी “कॅन्सरचा विळखा रोखण्यास सज्ज होवू या ” या विषयावर बोलत होत्या. अध्यक्षस्थानी माजी नगरसेवक विशाल सुर्यवंशी हे होते. प्रमुख उपस्थित किरण मडिलगेकर,राहुल सुर्यवंशी,सौ.आदिती सुर्यवंशी होते. रक्तदान शिबीराचे उदघाटन दीपप्रज्वलन,छ.शिवराय आणि स्व.रोहन साळोखे यांच्या प्रतिमा पुजनाने करण्यात आले. आरोग्यदूत स्व.रोहन जीवनराव साळोखे यांच्या स्मरणार्थ आयोजित या रक्तदान शिबीरात सुमारे पन्नास रक्तदात्यांनी रक्तदान केले.
आपल्या भाषणात डॉ.रेश्मा पवार यांनी कॅन्सर रोगाची सविस्तर माहिती, सांख्यिकी प्रमाणासह देवून, स्त्रीवर्गात कॅन्सरबद्दल अत्यंत दुर्लक्ष होत असल्याबद्दल खेद व्यक्त केला. अशीच बेफिकीरी राहिली तर, भविष्यात कॅन्सर रुग्णांची सर्वाधिक संख्या असणारा आपला भारत देश होईल,अशी भीती व्यक्त करून, कॅन्सर विरोधात मोठ्या प्रमाणात,सर्व स्तरावर जनजागरण झाले पाहिजे.” असे आग्रहाने सांगितले.
यावेळी मंडळास नेहमी सहकार्य करणाऱ्या बाजारपेठेतील शंभरावर मान्यवर हितचिंतकांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शाल,श्रीफळ,फेटा देवून सत्कार करण्यात आला.अंकूर ब्लड बॅन्क,निपाणी यांनी या शिबिरास सहकार्य केले. प्रारंभी विकी साळोखे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. संग्राम साळोखे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन पत्रकार अनिल पाटील यांनी केले. शिबिराच्या यशस्वितेसाठी रईस अत्तार,तौफिक अत्तार,शुभम सुर्यवंशी,सुरज मगर,मकरंद धर्माधिकारी,गौरव साळोखे,बंटी गवाणकर, गौरव मोर्चे,अमोल गोरूले,अनिकेत डाफळे,निखिल कलकुटकी इ.सह मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले.