मुरगूड ( शशी दरेकर )
शेती आधारित ग्रामीण उद्योजकता या महत्वपूर्ण विषयावर प्रबंध सादर, जिल्हा परिषदेची शाळा ते यशोदा टेक्निकल कॅम्पस चा सहसंचालक असा प्रेरणादायी प्रवास
हळदी ता. कागल गावचे सुपुत्र तसेच यशोदा इन्स्टिट्यूट्स, सातारा चे सहसंचालक डॉ. रणधिरसिंह दत्तात्रय मोहिते यांनी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर मधून पीएच.डी. पदवी प्राप्त केली असून, त्यांच्या या उज्ज्वल शैक्षणिक यशाबद्दल हळदी सह परिसरामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
“डेव्हलपमेंट ऑफ रुरल ऍग्रो बेसड अत्रप्रीनियरशिप इकोसिस्टम इन साऊथ वेस्ट महाराष्ट्र” या महत्त्वपूर्ण आणि समकालीन विषयावर त्यांनी केलेल्या संशोधनातून ग्रामीण भागातील विकास, उद्योग निर्मितीची गरज आणि उद्योजकतेच्या शाश्वत पद्धती यांवर मौलिक अभ्यासमूल्य निर्माण झाले आहे. त्यांच्या संशोधनाचे मार्गदर्शन डॉ. सारंग शंकर भोला यांनी केले असून, त्यांच्या शैक्षणिक आणि संशोधक मार्गदर्शनातून या अभ्यासाची गुणवत्ता अधिक समृद्ध झाली आहे.
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे वाणिज्य व्यवस्थापन विभागाचे अधिष्ठाता तथा प्रमुख डॉ. एस एस महाजन, डॉ. सारंग भोला, डॉ. केदार महारुळकर, डॉ. डि के मोरे, डॉ. दीपा इंगवले यांच्या हस्ते डॉ. रणधिरसिंह मोहिते यांचा विद्यापीठ अधि-विभागामध्ये सत्कार करण्यात आला.
विशेष म्हणजे रणधिरसिंह मोहिते यांचे प्राथमिक शिक्षण केंद्र शाळा हळदी, माध्यमिक शिक्षण चौंडेश्वरी हायस्कूल हळदी, उच्च माध्यमिक शिक्षण शिवराज विद्यालय जुनियर कॉलेज मुरगुड येथे झाले. त्यानंतर शिवराज कॉलेज गडहिंग्लजमधून पदवी संपादन केल्यानंतर, सायबर स्कूल ऑफ मॅनेजमेंट मधून पदवीउत्तर पदवी संपादन केली. त्यांच्या संपूर्ण शैक्षणिक प्रवासामध्ये बीसीए, एमबीए, एलएलबी, एम.फिल, जीडीसी अँड ए, पी.एचडी या पदवींचा समावेश आहे.
ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्था, मराठी माध्यमाचे शिक्षण यांचे महत्त्व वाढवणारे यश म्हणून या उपलब्धीची सर्वत्र प्रशंसा होत आहे. त्यांचे सेवेचा संपूर्ण काळ हा यशोदा इन्स्टिट्यूट मधील विविध विभागात व्यतीत झाला आहे, त्यांनी आजवर विभागप्रमुख- व्यवस्थापनशास्त्र, अंतर्गत गुणवत्ता हमी समन्वयक, परीक्षा नियंत्रक, प्रशिक्षण व रोजगार विभागप्रमुख, कुलसचिव, सहसंचालक अशा विविध अंगी जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.
डॉ. रणधिरसिंह मोहिते यांनी केलेले संशोधन हे ग्रामीण विकास आणि उद्योजकता क्षेत्रातील धोरणनिर्मितीसाठी मार्गदर्शक ठरेल. त्यांच्या सारख्या अभ्यासू आणि दूरदृष्टी असलेल्या व्यापकांमुळे संस्थेची शैक्षणिक परंपरा अधिक बळकट होते.
डॉ. मोहिते यांनी आपल्या संशोधन प्रवासाची माहिती सांगितली. त्यांनी ग्रामीण भागातील संसाधनांची समृद्धी, परंतु योग्य दिशा आणि मार्गदर्शनाअभावी उद्योजकतेला मिळणारी मर्यादा, तसेच शासन–खाजगी क्षेत्र–शैक्षणिक संस्था यांच्या प्रभावी समन्वयाची आवश्यकता यावर प्रकाश टाकला. आपल्या मार्गदर्शक डॉ. सारंग शंकर भोला यांचे विशेष आभार मानताना त्यांनी संशोधनात सातत्य, प्रामाणिकता व सामाजिक दायित्व जपण्याचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांच्या या यशाबद्दल शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
डॉ. मोहिते यांनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, काका-काकी, मार्गदर्शक शिक्षक, आजवर शिकविणारे शाळा तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक, कुटुंबीय आणि मित्रांना दिले.
हळदी गावचे सुपुत्र प्रा. रणधिरसिंह मोहिते यानां शिवाजी विद्यापीठाची पीएचडी पदवी प्राप्त
Advertisements
AD1