मुरगूड (शशी दरेकर) : शासकीय धोरणांमुळे सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेचे कंगालीकरण होत असून ही व्यवस्था भारतीय समाजाला कंगाल करणारी ठरत आहे, असा आरोप अभ्यासक संपत देसाई यांनी केला.
मुरगूड (ता. कागल) येथे समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती व्याख्यानमालेत “महात्मा फुले आणि आजची शिक्षण व्यवस्था” या विषयावर ते बोलत होते. व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी नगरपालिकेचे सॅनिटरी इन्स्पेक्टर सागर येवार होते.

देसाई यांनी सांगितले की, पडक्या शाळा, अपुऱ्या सुविधा, शौचालयांची दुरवस्था यामुळे विशेषतः मुलींची शाळाबाहेर पडण्याची संख्या वाढत आहे. कंत्राटी शिक्षक, नवीन शैक्षणिक धोरण आणि संचमान्यता नियमांमुळे राज्यातील हजारो शाळा पुढील एक ते दोन वर्षांत बंद होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

“भारतातील शिक्षण वाचवू शकलो नाही, तर महात्मा फुले यांची जयंती साजरी करण्याचा नैतिक अधिकार उरत नाही,” असे ठाम मत त्यांनी मांडले.
यावेळी नगरसेवक शिवाजी चौगले व दत्तात्रय मंडलिक उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक बी. एस. खामकर यांनी केले. आभार कॉ. बबन बारदेस्कर यांनी मानले, तर सूत्रसंचालन समीर कटके यांनी केले.
यावेळी दलितमित्र डी. डी. चौगले, एम. टी. सामंत, महादेव वागवेकर, सदाशिव एकल, शाहू फर्नांडिस, बाबुराव शिरसेकर, रणजीत कदम, मोहन कांबळे, भिकाजी कांबळे, सखाराम सावर्डेकर, जयवंत हावळ, विद्यागौरी हावळ, राहुल कांबळे, प्रदीप वर्णे, अनिकेत कदम, अक्षय कांबळे, पापा जमादार आदी उपस्थित होते.