आडी (राजकुमार पाटील) : परमाब्धि ग्रंथाची निर्मिती दैवी इच्छेने झाली आहे. त्यामध्ये सार्वत्रिक व सार्वकालिक सद्विचार आहेत. याचा सर्व जातिधर्मपंथातील लोकांनी पूर्ण विश्वासाने स्वीकार करावा. याचा शुभ परिणाम निश्चित होणार आहे, असे प्रतिपादन प.पू. परमात्मराज महाराज यांनी केले. ते आडी (ता. निपाणी) येथील संजीवनगिरी वरील श्रीदत्त देवस्थान मठाच्या वतीने श्रीदत्त जयंती निमित्ताने आयोजित परमाब्धि विचार महोत्सवाच्या पाचव्या दिवशीच्या प्रवचन कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी सकाळी श्री दत्तगुरू चरणी अभिषेक अर्पण करून महाआरती करण्यात आली. यावेळी नामजप व भजन गायनानंतर श्री गुरुचरित्र पारायणाच्या दुसऱ्या दिवशीच्या सत्राचा भाविकांनी लाभ घेतला. रात्री साडेसात वाजता नाम जपानंतर आयोजित प्रवचन कार्यक्रमात बोलताना प.पू. परमात्मराज महाराज पुढे म्हणाले, जगातील सर्व दैवताचा, सर्व धर्मातील साधुसंतांचा सन्मान जनमनामध्ये राहू दे. त्या सर्वांचा नामउल्लेख परमाब्धि ग्रंथामध्ये आदराने केलेला आहे. विविध सांप्रदायिक संकुचित विचाराचे लोक फक्त आपल्या आपल्या संप्रदायातील दैवताला आई मानतात व अन्य दैवतांना तुच्छ लेखत असतात. दुसऱ्यांच्या आईला वाईट बोलतात.
त्यामुळे त्या दैवतांचा आशीर्वाद मिळत नसतो. नियतीच्या खेळामध्ये त्यांना शिक्षा होणारच असते. दुसऱ्या विषयी वाईट चिंतनाचे परिणामही वाईट होत असतात. परमाब्धि ग्रंथामध्ये सर्वधर्मातील सद्विचारांचा, दैवतांचा, साधुसंताचा आदर केला असल्याने परमाब्धि वाचकाला त्यांचा आशीर्वाद मिळून शुभ परिणाम लाभत आहे. अनेक लोक प्राचीन धर्मशास्त्राचा विपरीत अर्थ लावत आहेत. म्हणून जगामध्ये कलह, हिंसाचार वाढलेला आहे. मात्र परमाब्धि अर्थासह आहे. त्याचा वेगळा अर्थ कोणीही लावणार नाही.
रोजच्या जीवनात आहारामध्ये उपयोगात येणारा घटक हळद आहे. हळद बनविताना त्यामध्ये धान्याचे पीठ व रंग येण्यासाठी घातक रासायनिक घटक मिसळले जातात. त्यामुळे भेसळयुक्त हळद खाऊन मुलांची बौद्धिक क्षमता कमी होते. किडनीचे आजार, कॅन्सर सारखे आजार होऊन अनेकांच्या जीवावर बेतले जात आहे. याशिवाय अन्य अन्नामध्येही होणाऱ्या भेसळीमुळे जगभरात शारीरिक स्वास्थ्य बिघडत आहे.
त्याप्रमाणे प्राचीन वाङ्मयातील भेसळीमुळे सामाजिक व आध्यात्मिक क्षेत्रातील स्वाथ्य बिघडले आहे. छपाई तंत्रज्ञान विकसीत होण्याच्या आधी भूर्जपत्रादींवर लेखन केले जात होते. त्यावेळी प्राचीन वाङ्मयामध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ झाली आहे.पूर्वी धर्मशास्त्रा मध्ये झालेल्या भेसळीचे परिणाम जग भोगत आहे. भेसळ करणारे या हिंसाचाराला कारणीभूत आहेत.
संतवाङ्मयामध्ये सुद्धा भेसळ झाली आहे. त्या ग्रंथांचा आधार घेऊन भांडत बसू नका. जरी ग्रंथ वाचत असाल तरी त्यामधील आक्षेपार्ह विचार आपल्या संतांचे नव्हेत असे ठाम समजून घ्या. जगातील सर्व धर्मग्रंथांचे सार युक्त विशुद्ध ज्ञान परमाब्धि मध्ये आहे त्याचे वाचन, पारायणे करा. परमाब्धि संस्कृत असून मराठी अर्थासह असल्याने वेगळा अर्थ लावण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
शिळेपाके अन्न खाऊ नये. अन्न बनवितांना अन्न शुद्धी, अन्न सुरक्षा महत्वाची आहे. त्यासाठी योग्य ती दक्षता घेतली पाहिजे. फास्टफूड, अन्न पदार्थ खरेदी करतांना त्यावरील तयार केलेली तारीख व मुदतीची तारीख पाहून खरेदी करणे आवश्यक असते. त्याच प्रमाणे धर्मग्रंथातील काही रूढी परंपरा, चालीरीती आजच्या काळात समाज मान्य नाहीत अथवा त्या पासून कोणतेही समाजाचे हित होणार नाही, असे कालबाह्य विचार सोडून द्यायला हवेत. सर्व काळाचा विचार करून सर्वस्थानांचा विचार करून अनंत काळासाठी उपदेश करीत राहतील असे सद्विचार परमाब्धि मध्ये आहेत. परमाब्धि चे दैवी इच्छने अनंत काळासाठी शुभपरिणाम लाभणार आहेत. त्याचा अनुभव घेत राहावे, असे सांगितले.
यावेळी डॉ .बालेश आण्णाप्पा माने भोज, सुरेश कृष्णा बस्तवडे, सचिन आप्पासो कोंडेकर हंचिनाळ, राजेंद्र नामदेव नलवडे गारगोटी, वसंत अशोक तोडकर दिग्रज (जि.सांगली) यांच्या वतीने महाप्रसादाची सोय करण्यात आली होती.
यावेळी हालशुगरचे चेअरमन एम.पी. पाटील, भोगावती शुगर चे प्रा. ए.डी. चौगुले, भोगावतीचे एम.डी. संजय पाटील आदी उपस्थित मान्यवरांचा व विविध भजनी मंडळांनी केलेल्या सेवेबद्दल त्यांचा प.पू. परमात्मराज महाराज व देविदास महाराज यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी आडी, बेनाडी, कोगनोळी, हणबरवाडी, हंचिनाळ, सौंदलगा, निपाणी, कागल, बेळगांव, कोल्हापूर, सांगली, पुणे, मुंबई, सिंधुदुर्ग, सातारा, छ.संभाजीनगर आदी भागातील असंख्य भाविकांची उपस्थिती होती.