कोल्हापूर (जिमाका): क्रीडा व युवक सेवा संचालनायलय, पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कोल्हापूर यांच्या मार्फत शालेय विद्यार्थ्यांसाठी दि. 12 ते 18 डिसेंबर 2024 या कालावधीत छत्रपती शिवाजी स्टेडियम, खासबाग मैदान, कोल्हापूर येथे क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
दि. 12 डिसेंबर रोजी योगा, 13 डिसेंबर रोजी लगोरी, लिंबू चमचा व संगीत खुर्ची, 14 डिसेंबर रोजी झूंबा डान्स व ऐरोबिक्स, 15 डिसेंबर रोजी शिक्षकांसाठी मैदानी स्पर्धा 100 मी. धावणे व सॅक रेस, दि. 16 डिसेंबर रोजी चित्रकला स्पर्धा, 17 डिसेंबर रोजी लेझिम व मर्दानी खेळ व 18 डिसेंबर रोजी झांजपथक याप्रमाणे आयोजन करण्यात आले असून सर्व उपक्रम छत्रपती शिवाजी स्टेडियम, खासबाग मैदान, कोल्हापूर येथे होणार आहेत.
राज्यात सध्या क्रीडा व खेळाचा प्रचार शहरी भागात आढळतो. जोपर्यत ग्रामीण भागापर्यंत क्रीडा व खेळाचे महत्त्व पोहचून युवक युवतींमध्ये क्रीडा विषयक जाणीव व वातावरण निर्माण होणार नाही तोपर्यंत ख-या आर्थाने क्रीडा व खेळाची प्रगती करणे शक्य होणार नाही. ही वस्तुस्थिती लक्षात घेवून शासनाच्या वतीने सन 1991-92 या वर्षापासून दि. 12 ते 18 डिसेंबर या कालावधीत क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात येते.
या क्रीडा स्पर्धांचे आयोजन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात येणार आहे. कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालये स्पर्धेत सहभागी होवू शकतील. सहभागी संघातून प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांकाच्या संघाना प्रमाणपत्र व ट्रॉफी देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी नीलिमा अडसूळ यांनी दिली आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्याल, छत्रपती शिवाजी स्टेडियम, खासबाग मैदान, कोल्हापूर येथे संपर्क साधावा.