कोल्हापूर
:
जिल्ह्यामधील समस्याग्रस्त व पिडीत महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे, त्यांच्या हक्काचे संरक्षण होवून त्यांना न्याय मिळावा या दृष्टीने महिलांच्या अडचणींची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी व समाजातील पिडीत महिलांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीराचे’ आयोजन दि. 11 ते 30 मे 2023 या कालावधीमध्ये करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शिल्पा पाटील यांनी दिली.
शिबिरामध्ये जिल्हा कार्यक्रम अधिकारी, तहसिलदार, गट विकास अधिकारी, पोलीस विभाग, महिला आर्थिक विकास महामंडळ विभाग सहभागी होणार असून त्यांच्यामार्फत विभागाशी संबंधित असणाऱ्या तक्रारींचे निराकरण करण्यात येणार असून योजनांची माहिती देण्यात येणार आहे. तक्रारदार महिलांनी त्यांच्या काही तक्रारी असल्यास तात्काळ संबंधित गावामधील ग्रामसेवक, पोलीस पाटील, अंगणवाडी पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्याशी तसेच नगरपालिका व महानगरपालिका क्षेत्रातील तक्रारदार महिलांनी तालुक्याच्या पंचायत समितीमधील संरक्षण अधिकरी (अभय केंद्र), महिला व बाल विकास विभागाशी संपर्क साधून तक्रारी द्याव्यात, असे आवाहनही श्रीमती पाटील यांनी केले आहे.