व्हनाळी : वार्ताहर
शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी दिवसा दहा तास वीजपुरवठा करावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली ताराबाई पार्क कोल्हापूर येथील महावितरणच्या कार्यालयासमोर सुरू असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनास माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी आंदोलनस्थळी उपस्थित राहून आंदोलनास आपला जाहीर पाठिंबा दिला.
यावेळी बोलताना संजय घाटगे म्हणाले, शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा आहे अस्मानी संकटांचा सामना करत शेतकऱ्यांना शेती करावी लागते. उभ्या पिकांना पाणी देत असताना रात्रीच्या वेळी सर्पदंश होणे, जंगली प्राण्यांकडून हल्ला होणे यामध्ये अनेक शेतकऱ्यांना जीव गमवावा लागला आहे त्यामुळे शेती पंपांना दहा तास दिवसा वीज मिळणे आवश्यक आहे.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नेहमीच सातत्याने आपले सर्वस्व खर्ची घालणारे दोनच नेते कोल्हापूर जिल्ह्याला लाभले त्यामध्ये कै .प्रा. एन.डी. पाटील व त्यानंतर माजी खासदार राजू शेट्टी हे एकमेव नेतेच शेतकरी प्रश्नांसाठी झगडत आहेत असे प्रतिपादन अन्नपूर्णा शुगर चे चेअरमन ,माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी केले.यावेळी प्रदेशाध्यक्ष जालंदर पाटील ,जिल्हाध्यक्ष सागर कोंडेकर, जनार्दन पाटील ,अजित पवार ,राजेंद्र गड्डंवार, प्रभु भोजे, तानाजी मगदूम ,सावकर मादनाईक, विक्रम पाटील ,सागर शंभू शेट्टी आदी शेतकरी उपस्थित होते.