कागल : शिरोडा (जि. सिंधुदुर्ग) येथील समुद्रात बुडून कागल येथील अवधूत हरिभाऊ जोशी (वय ३९) यांचा मृत्यू झाला. दिनांक 26 च्या दुपारी ३ च्या सुमारास ही घटना घडली. अवधूत जोशी हे त्यांच्या मित्रांसोबत वेळागर-शिरोडा येथे पर्यटनासाठी गेले होते.
समुद्रकिनारी पोहण्यासाठी सर्वजण पाण्यात गेले होते. यावेळी अवधूत यांना पाण्याचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडाले. यावेळी मित्रांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत अवधूत हे पूर्ण दिसेनासे झाले. सायंकाळी ४.३० च्या दरम्यान त्यांचा मृतदेह आढळून आला.
मित्रपरिवाराने स्थानिक ग्रामस्थांच्या साहाय्याने मृतदेह बाहेर काढला. याबाबत सिद्धार्थ मधुकर लोखंडे यांनी वेंगुर्ला पोलिसांत खबर दिली. त्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रेडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवला आहे.
अवधूत जोशी हे शिवाजी विद्यापीठाच्या ‘डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी’ या विभागात शिपाई म्हणून कार्यरत होते. त्यांच्यामागे पत्नी, आई- वडील असा परिवार आहे.