मुरगूड ( शशी दरेकर ): आज देवशयनी आषाढी एकादशी.मुरगूड मधील विठ्ठल मंदिरा पासून विठ्ठल रूक्मिणी ची शानदार पालखी काढण्यात आली. अत्यंत भक्तिमय वातावरणात पालखीचे ठिक-ठिकाणी स्वागत करण्यात आले.
” विठु माऊली तू माऊली जगाची

राजा तू पंढरीचा..राजा तू पंढरीचा
अवघे गर्जे पंढरपूर, चालला विठू नामाचा गजर.”
अशा भक्तिगीतांच्या तालावर विठ्ठल भक्तांनी शहरातील प्रत्येक मंदिराच्या ठिकाणी पालखीचे स्वागत करून आरती केली. गाव भागातील अंबाबाई मंदिर,राम मंदिर,जुन्या पोलिस ठाण्यातील दत्त मंदिर,हनुमान मंदिर, गणेश मंदीर, जवळून आंतरराष्ट्रीय किर्तीचे प्रवचनकार डॉ. देशमुख ( काका ) यांच्या निवास्थळी पालखी पोहोचली आणि भक्तीमय वातावरणात भक्तगण न्हाऊन निघाले.
नाका नं १ वरुन बाजारपेठ दिशेने पालखी अग्रक्रमण करत, राणाप्रताप चौक येथिल सुखदेव येरुडकर यांच्या घरासमोर खिचडी, हाजी धोंडीराम मकानदार यांच्या लकी शेती सेवा केंद्र येथे राजिगरा लाडू, उपवासाचा चिवडा, बाजारपेठेच्या मध्यावर असणारे दरेकरांच्या किराणा दुकानासमोर भक्तानां बटाटे वेपर्सच्या पुड्यांचे वाटप व अन्य ठिकाणीही उपवासाचे पदार्थ वाटण्यात आले.
याचबरोबर अनेक ठिकाणी पालखीची आरती झाली.वारकरी पंथाच्या भक्तांनी टाळ मृदुंगाच्या तालावर रिंगण केले.फुगडी घातली,भजने म्हणत भक्तीमय. वातावरणात परिसर न्हाऊन निघाला. ठिकठिकाणी खिचडी, केळे, दूध, राजगिरी लाडू ,बटाटे वेफर्सचे भक्तजन वाटप करत होते.
या पालखी मिरवणुकीत विश्वास रावण, धोंडीराम राऊत, शामराव मेंडके,धोंडीराम खैरे, प्रशांत शहा, किशोर पोतदार, धोंडीराम मकानदार , शशी दरेकर, सुहास खराडे, भाऊ येरुडकर, मारुती शेट्टी, संतोष लोहार, साताप्पा मेंडके, महादेव वंडकर ,चंद्रकांत तिकोडे ,श्रीरंग गुरव, सचिन गुरव, निंगाप्पा सिद्धाप्पा, नवर किल्ले, प्रकाश मगदूम, कृष्णा कुंभार, शिवाजी गोंधळी, विठ्ठल भुते, सर्जेराव भाट यांच्यासह भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.