मुरगूड पालिकेच्या नगर अभियंत्याला ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले मुरगूड परिसरात खळबळ, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

मुरगूड ( शशी दरेकर )

हुपरी नगरपरिषद अंतर्गत रस्ता कामाचे सुमारे ७० लाख रुपयांचे बिल मंजूर करून देण्यासाठी लाच मागणाऱ्या मुरगूड नगरपरिषदेतील नगर अभियंता प्रदीप पांडुरंग देसाई (वय ३२, मूळ रा. मिणचे खुर्द, ता. भुदरगड) यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मुरगूड एस.टी. बसस्थानक परिसरात ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना सापळा रचून रंगेहात पकडले. या प्रकरणी मुरगूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे मुरगूड परिसरात खळबळ उडाली.

मुरगूड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हुपरी नगरपरिषद अंतर्गत रस्ता काम पूर्ण केलेल्या एका ठेकेदाराचे सुमारे ७० लाख रुपयांचे बिल मंजूर करण्यासाठी व एम.बी. रजिस्टर पूर्ण करून देण्याच्या मोबदल्यात तत्कालीन हुपरी नगर अभियंता प्रदीप देसाई यांनी दीड लाख रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीनंतर १ लाख ३० हजार रुपये देण्याचे ठरले होते. यापैकी ५० हजार रुपये आरोपीने यापूर्वी स्वीकारले होते.
उर्वरित ८० हजार रुपयांपैकी पहिला हप्ता म्हणून ४० हजार रुपये आज देण्याचे ठरले होते. त्यानुसार संबंधित ठेकेदार लाच रक्कम घेऊन मुरगूड येथे आला असता, आरोपीने ही रक्कम मुरगूड एस.टी. बसस्थानकात उभ्या असलेल्या कारमध्ये ठेवण्यास सांगितले. त्याच वेळी सापळा लावून थांबलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आरोपीला रंगेहात पकडले. यावेळी लाच रक्कम व आरोपीचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला.

Advertisements


यानंतर आरोपीला मुरगूड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. आरोपीच्या घरझडतीसाठी स्वतंत्र पथक तत्काळ रवाना करण्यात आले असून घरझडतीची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पथकात हेड कॉन्स्टेबल सुधीर पाटील, संदीप काशीद, पोलीस कॉन्स्टेबल कृष्णा पाटील व वाहन चालक प्रशांत दावणे यांचा समावेश होता. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक उज्वला भडकमकर करीत आहेत.


लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आलेले नगर अभियंता प्रदीप देसाई.

Advertisements
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!