कोल्हापूर, दि. 30 : पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्यात येणार आहे. पुरस्कारासाठी जिल्ह्यातील धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे नोंदणी केलेल्या किंवा स्थानिक पोलीसाकडून परवानगी घेतलेल्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्था यांची परवानगी घेतलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सहभागी होता येणार आहे. जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या mahotsav.plda@gmail.com या ई- मेलवर दिनांक 5 सप्टेंबर पुर्वी ऑनलाईन अर्ज करावेत.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला पारितोषिक
या स्पर्धेसाठी जिल्हास्तरावरुन राज्यस्तरावर निवड होणाऱ्या एका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला 25 हजाराचे पारितोषिक व प्रमाणपत्र सन्मानपूर्वक वितरीत करण्यात येईल. यात सन 2023 मध्ये राज्यातील पहिल्या 3 विजेत्या गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून अनुक्रमे प्रथम क्रमांक 5 लाख रुपये, द्वितीय क्रमांकास 2.5 लाख रुपये तर तृतीय क्रमांकास 1 लाख रुपये असे पारितोषिकाचे स्वरुप आहे. जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन पालकमंत्री दीपक केसरकर व जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची निवड करण्यासाठी निकष पुढीलप्रमाणे- पर्यावरणपूर्वक मूर्ती -10 गुण, पर्यावरणपूर्वक सजावट (थर्माकोल व प्लॉस्टिक विरहित) -15 गुण, ध्वनी प्रदुषणविरहित वातावरण -5 गुण, पाणी वाचवा, अंधश्रध्दा निर्मुलन इत्यादी समाज प्रबोधन, सामाजिक सलोखा संदर्भात सजावट/देखावा, स्वातंत्र्य चळवळीसंदर्भात /छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक वर्षानिमित्ताने सजावट / देखावा -20/25 गुण देखाव्याप्रमाणे,
गणेशत्सव मंडळाने वर्षभरात रक्तदान शिबीर, गडकिल्ले संवर्धन, पर्यावरण रक्षण, सेंद्रीय शेती, सौर उर्जेबद्दल जागरुकता निर्माण करणे, अॅम्ब्युलन्स चालविणे, वैद्यकीय केंद्र चालविणे इ. सामाजिक कार्य – 20 गुण. शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थी / विद्यार्थींसाठी यांच्या शैक्षणिक, आरोग्य, इ. बाबत केलेले कार्य- 15 गुण. महिला, ग्रामीण भागातील वंचित घटक यांच्यासाठी शैक्षणिक, आरोग्य, सामाजिक इ. बाबत केलेले कार्य 15 गुण. पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम/स्पर्धा-10 गुण, पारंपारिक / देशी खेळांच्या स्पर्धा -10 गुण. गणेश भक्तांसाठी देत असलेल्या प्राथमिक सुविधा उदा. पाणी/प्रसाधन गृह/वैद्यकीय प्रथमोपचार/ वाहतुकीस अडथळा येणार नाही असे आयोजन, आयोजनातील शिस्त, परिसरातील स्वच्छता (प्रत्येक सुविधेस 5 गुण)- 25 गुण.
जिल्हाधिकारी यांच्या समन्वयाखाली निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त जिल्हास्तरीय समिती व प्रत्येक तालुका निहाय तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय समिती जिल्ह्यातील ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना गणेशोत्सव काळात भेट देईल. या समितीला मंडळांनी आपल्या कार्यक्रमाचे फोटो, अहवाल, व्हिडिओ भेटीवेळी सादर करावेत.
You have mentioned very interesting points! ps decent site..