सोमवारचा बाजार शहरात आणल्याबद्दल व्यक्त केली कृतज्ञता
कागल शहरात सुसज्ज व अद्ययावत व्यापारी संकुल उभारण्याचा निर्धार
कागल, दि. ३०: कागल शहरातील व्यापाऱ्यांकडून आमदार हसन मुश्रीफ यांचा सत्कार झाला. निपाणीवेस परिसरात गेलेला कागलचा आठवडी बाजार मुख्य शहरात आणल्याबद्दल व्यापाऱ्यांनी हा कृतज्ञतापर सत्कार केला.
सत्काराला उत्तर देताना आमदार हसन मुश्रीफ म्हणाले, कागलला झालेली पंचतारांकित औद्योगिक वसाहत आणि वाढलेल्या लोकसंख्येमुळे बाजारही मोठा झाला आहे. नागरिकांना आणि विशेषतः महिलांना त्रास होणार नाही, याबद्दलची खबरदारी घेण्याच्या सूचना प्रशासनाला केलेल्या आहेत. व्यापाऱ्यांच्या काहीही अडचणी असतील तर थेट मला सांगा. आठवडी बाजाराच्या मुद्द्यावरून काही लोक नाटकं करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा राजकारणाला बळी पडू नका.
माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर म्हणाले, कागल शहरात बाजारामुळे होणारी गर्दी व विस्कळीतपणामुळे स्वर्गीय विक्रमसिंहराजे घाटगे यांनीच आमदार हसन मुश्रीफ यांना बाजार गावाबाहेर हलविण्याच्या सूचना केल्या होत्या. कदाचित समरजीत घाटगे यांना माहीत नसावं. आठवडी बाजारावरून कुणीतरी राजकारण करीत असेल, तर हे कदापि चालू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने म्हणाले, स्वर्गीय विक्रमसिंहराजे घाटगे यांनीच आमदार हसन मुश्रीफ यांना मुख्य बाजारपेठेतील आठवडी बाजार बाहेर व्यवस्था करण्याच्या सूचना केल्या होत्या. लवकरच कागल शहरातील जिल्हा परिषदेच्या जागा आणि जुन्या तहसील कार्यालयाची जागा या ठिकाणी व्यापारी कॉम्प्लेक्स उभारण्याचा आमचा मानस आहे.
नगरसेवक प्रवीण काळबर म्हणाले, आमदार हसन मुश्रीफ कागल शहरातील व्यापाऱ्यांच्या नेहमीच हिमालयासारखे पाठीशी उभारले आहेत. व्यापारांसाठी शहरात जुन्या तहसील कार्यालयाच्या जागेवर लवकरच व्यापारी कॉम्प्लेक्स उभारण्याचा आमचा निर्धार आहे.
माजी नगराध्यक्ष नवल बोते, बाबासाहेब नाईक, नवाज मुश्रीफ, नितीन दिंडे, विवेक लोटे, प्रवीण काळबर, संजय ठाणेकर, सुनील माळी, सुनील माने, ॲड. संग्राम गुरव, राजू आमते, पंकज खलिफ, कुमार पिष्टे, शानुर पखाली, इरफान मुजावर, विक्रम जाधव, अमर सणगर, सुनील कदम, राहुल चौगुले आदी प्रमुख उपस्थित होते. व्यापारी संघटनेच्यावतीने योगेश गाताडे यांनी आभार मानले.