ताज्या घडामोडी

जिल्ह्यातील लम्पी चर्मरोग साथ नियंत्रणात – जिल्हाधिकारी राहुल रेखावार

कोल्हापूर, दि. 16 : जिल्ह्यामध्ये उद्भवलेल्या गो-वर्गीय पशुधनामध्ये लम्पी चर्मरोग साथीच्या सांसर्गिक रोगामुळे आजअखेर 1 हजार 96 इतकी जनावरे मृत झाली. सद्यस्थितीत गो-वर्गीय पशुधनामध्ये लम्पी चर्मरोग साथीने बाधित होण्याचे प्रमाण अत्यंत नगण्य असल्याने गोवर्गीय लम्पी चर्मरोग साथ नियंत्रणात आल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली आहे.

जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम पशुवैद्यकीय दवाखाना चौकाक, तालुका हातकणंगले अंतर्गत असणा-या अतिग्रे गावाअंर्तगत चौगुलेवाडी येथे गायीला लम्पी चर्मरोगाची लक्षणे दिनांक 3 सप्टेंबर 2022 रोजी आढळून आली. यानंतर हा रोग जिल्ह्यामध्ये गोवर्गीय जनावरांमध्ये पसरु लागला.

पहिला गोरुग्ण आढळल्यानंतर पशुसंवर्धन विभागामार्फत तात्काळ जिल्हाभर एकूण 2 लाख 87 हजार 963 गोवर्गीय जनावरांमध्ये गोट-पॉक्स लसीकरण करण्यात आले. यामुळे जनावरांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती तयार झाल्याने रोगाचा प्रादुर्भाव म्हैस वर्गामध्ये आढळून आला नाही.

आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 17 हजार 504 गोवर्गीय जनावरे लम्पी चर्मरोगाने बाधित झाली होती. त्यापैकी 16 हजार 291 जनावरे रोगमुक्त झाली आहेत. रोग बाधित होण्याचा दर 6.11 टक्के इतका असून रोगमुक्त होण्याचा दर 93.07 टक्के इतका असल्याचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.वाय.ए.पठाण यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *