मुरगूड ( शशी दरेकर ): येथील मुरगूड ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने
लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती विरंगुळा केंद्रात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष गजाननराव गंगापुरे होते.
प्रारंभी एम टी सामंत आणि ज्ञानेश्वर चौगुले यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले . यावेळी एम टी सामंत यांनी लोकमान्य टिळक हे जहाल मतवादी होते. टिळकांनी लिहिलेला सरकारचे डोके ठिकाणावर आहे का ? या लेखाची सविस्तर माहिती सांगितली. त्यानंतर किशोर पाटील यांनी लोकमान्य टिळक यांच्या देशभक्तीची अनेक उदाहरणे देऊन त्यांनी स्वातंत्र्य लढ्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली .

यावेळी पी आर पाटील यांनी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा जीवनपट उलघडून सांगितला. त्यांनी ३५ कादंबऱ्या २० कथासंग्रह १२ चित्रपट कथा लिहिल्या तसेच अनेक साहित्यप्रकार, पोवाडे यांच्या रचना केल्या.
आजची शाहिरी परंपरा अण्णाभाऊंची देणगी मानावी लागेल. तमाशा, कलापथक, कामगार चळवळ, मार्क्सवादी विचार अधिक रुजविण्यासाठी अण्णाभाऊंचे योगदान मोलाचे आहे. लोकशाहीर आण्णाभाऊंच्या स्मारकासाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या घरासाठी शासनाने प्रयत्न करावा अशी अपेक्षा प्रा.चंद्रकांत जाधव यांनी व्यक्त केली .
या कार्यक्रमाचे संयोजन अशोक डवरी यांनी केले. तर आभार प्रदीप वर्णे यांनी मानले. यावेळी पी डी मगदूम, आर डी चौगले, गणपती शिरसेकर, मधुकर येरूडकर आदि सदस्य उपस्थित होते.