कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या विधी विभागाच्या विद्यार्थ्यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणास भेट देऊन ‘मध्यस्थी’ विषयावर पथनाट्य सादरीकरण केले.
कार्यक्रमास जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव प्रीतम पाटील, विद्यापीठाचे विधी विभाग प्रमुख डॉ. विवेक धूपदाळे, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्याचे उपाध्यक्ष विवेकानंद घाटगे, कौटुंबिक न्यायालयाच्या बार असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र पाटील उपस्थित होते.
डॉ. धूपदाळे यांच्या हस्ते जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव प्रीतम पाटील यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. विधी सेवा प्राधिकरण कार्याची सविस्तर माहिती देऊन न्यायालयीन वाद तडजोड आणि आपापसात मिटवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असे प्रतिपादन प्रीतम पाटील यांनी केले.
डॉ. धूपदाळे यांनी वैकल्पिक वाद निवारणाबाबत मार्गदर्शन केले. विवेकानंद घाडगे यांनी प्रकरणांमध्ये मध्यस्थी करताना वकिलांची भूमिका कशा पद्धतीने बजावली पाहिजे याबाबत मार्गदर्शन केले तर राजेंद्र पाटील यांनी पथनाट्यद्वारे विधी सेवेची माहिती वंचित घटकापर्यंत कशा पद्धतीने पोहोचवता येईल याबाबत सविस्तर माहिती सांगितली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोद दाभाडे (शिवाजी विद्यापीठ विधी शाखा जी.एस.) यांनी केले. तर आभार प्रियंका गुरव यांनी मानले. यावेळी राजीव माने, राम गोपलानी, औदुंबर बनसोडे, जयदीप कदम, चंद्रकांत कुरणे, देवदास चौगले, ऋता निंबाळकर, अंजली करपे यांसह विद्यार्थी उपस्थित होते.