मुरगुड पंचक्रोशीतील भाविक थेट गणपतीपुळ्याकडे रवाना!
मुरगुड ( शशी दरेकर ) : नवीन वर्षाची पहिली पहाट भक्ती आणि श्रद्धेच्या तेजाने उजळून निघाली… ‘गणपती बाप्पा मोरया’ च्या जयघोषात मुरगुड पंचक्रोशीतील शेकडो भाविक एस टी च्या लालपरीतून थेट श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे दर्शनासाठी रवाना झाले.

अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या पावन पर्वानिमित्त महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने भाविकांसाठी थेट बससेवेची विशेष सुविधा उपलब्ध करून दिली असून, मुरगुड येथून १० व गारगोटी येथून ४ अशा एकूण १४ बसेस आरक्षित करण्यात आल्या आहेत. यापैकी रविवारी, ४ जानेवारी रोजी ४ विशेष बसेस भाविकांना घेऊन थेट गणपतीपुळ्याकडे मार्गस्थ झाल्या.

महाराष्ट्र एस टी महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी अभिजीत भोसले व मुरगूड चे नवनिर्वाचित नगरसेवक रणजीत भारमल यांच्या तथा अन्य भाविकांच्या हस्ते पूजन करून व श्रीफळ अर्पण करून या बसेस तीर्थाटनास सोडण्यात आल्या.
‘एसटी संगे तीर्थाटन’ या उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या या यात्रेला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून, सुरक्षित, आरामदायी आणि शिस्तबद्ध प्रवासाचा अनुभव भाविक घेत आहेत. शासनाच्या धोरणानुसार महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के सवलत, तर ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची सुविधा दिल्याने भाविकांमध्ये समाधानाची भावना व्यक्त होत आहे.
सदर बसेस सकाळी मुरगुड व गारगोटी येथून रवाना होऊन कोल्हापूर — मलकापूर — निवळी फाटा मार्गे दुपारी १ वाजता गणपतीपुळे येथे पोहोचणार आहेत. दर्शनानंतर दुपारी ३ वाजता परतीचा प्रवास सुरू होऊन रात्री १० पर्यंत सर्व बसेस परतणार आहेत.
यावेळी गारगोटी स्थानक व्यवस्थापक अनिकेत चौगुले,मुरगूड पत्रकार संघाचे उपाध्यक्ष राजू चव्हाण, वाहतूक नियंत्रक बाबुराव परीट, ज्येष्ठ व्यापारी व व्यापारी नागरी सह.पतसंस्थेचे संचालक प्रशांत शहा, किशोर पोतदार यांच्यासह अनेक ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.