व्यवस्था बदलण्याचे केजरीवाल यांचे स्वप्न भंगले

भ्रष्टाचाराच्या विरोधात लढणाऱ्या अरविंद केजरीवाल यांच्यासारख्या नेत्याला दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत पराभूत करून जनतेने फार मोठी चूक केली. या निवडणुकीत दिल्लीच्या जनतेने आम आदमी पक्षाचे सरकार पाडले. आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यासह त्यांच्या पक्षाचे अनेक दिग्गज नेते पराभूत झाले. केजरीवाल प्रामाणिकपणाने लढले. सत्याने लढले. कणखरपणे लढले. त्यांना विधानसभेच्या निवडणुकीत देशातील भ्रष्ट मंडळींनी एक होऊन घेरले. भविष्यात काळ आपल्याला माफ करणार नाही. मोठ्या पगाराची नोकरी सोडून ते देशातील जनतेसाठी लढत होते. आपण केजरीवाल यांना म्हणावी तशी साथ दिली नाही. मग आपणही भ्रष्टाचारात सहभागी आहोत असे समजावे काय. अशा या लढाऊ नेत्याचे जीवन समजावून घेणे गरजेचे आहे.

Advertisements

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा जन्म 19 ऑगस्ट 1968 रोजी हरियाणाच्या हिसार जिल्ह्यातील सीवानी गावी झाला. कृष्णअष्टमीला जन्म झाल्याने लहानपणी त्यांना घरी कृष्णा असे संबोधले जाई. त्यावेळी कुणाच्या लक्षातही आले नसेल की हा कृष्णा भावी काळात भल्याभल्यांची कृष्णकारस्थाने बाहेर काढून त्यांना सळो की पळो करून सोडेल. गोविंदराम आणि गीतादेवी या दाम्पत्यांचा हा मुलगा. वडील वीज मंडळात असल्याने त्यांच्या सारख्या बदल्या व्हायच्या. त्यामुळे कुटुंबाची मोठी भ्रमंती झाली. हिसार, सोनपत, मथुरा या उत्तर भारतातील गावी त्यांचे शिक्षण झाले. घरामध्ये शैक्षणिक वातावरण असल्याने त्यांना लागेल ती पुस्तके, साहित्य मुबलक मिळत असे. अरविंद जन्मजात हुशार असल्याने त्यांची स्मरणशक्ती प्रभावी होती.

Advertisements

त्यांना अभ्यासाबरोबर क्रिकेट, फुटबॉलची आवड होती. विशेषता त्यांना बुद्धिबळ हा खेळ फार आवडायचा. रंजना आणि मनोज ही त्यांची दोन भावंडे. रंजना ही डॉक्टर आहे तर मनोज हा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. जन्मजात हुशार असणाऱ्या अरविंद यांनी डॉक्टर व्हावे असे घरातील मंडळींना वाटत असे. पण त्यांचा इंजिनिअरिंगकडे कल होता. मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी आयआयटी प्रवेश घेतला. त्यांच्या कॉलेजमधील वातावरण वेगळं होतं. तेथे भ्रष्टाचार, परिवर्तन या विषयावर चर्चा चालत असे. त्याच काळात देशाची अर्थमंत्री व्ही.पी. सिंग यांनी रिलायन्स कंपनीस जमीन खरेदीस विरोध केला होता. नंतर व्ही.पी. सिंग देशाचे पंतप्रधान झाले. उत्तर प्रदेशात एका प्रकल्पासाठी अनिल अंबानी यांनी मोठ्या प्रमाणात जमीन संपादन केल्या होत्या. त्याला व्ही.पी. सिंग यांनी आव्हान दिले होते. व्ही.पी. सिंग यांचा साधेपणा आणि मोठ्या उद्योगपतींना जाहीर आव्हान देण्याच्या कृतीचा अरविंद यांच्यावर मोठा प्रभाव पडला. 1995 साली भारतीय प्रशासकीय सेवेत आयकर विभागात सह आयुक्त म्हणून ते सेवेत रुजू झाले. या काळात त्यांना भ्रष्टाचाराचा जवळून अनुभव आला.

1991 साली पंतप्रधान पी.व्ही नरसिंहराव सरकारच्या नेतृत्वाखाली देशाने मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारली. त्यामुळे परदेशी कंपन्या भारतात येऊ लागल्या. आपण भारतावर उपकार करीत आहोत असे या कंपन्यांना वाटत असे. या कंपन्यांची दडपशाही केजरीवाल यांनी जवळून पाहिली. कंपन्यांचा भ्रष्टाचार लक्षात आल्यावर त्यांनी विरोध केला. कंपन्यांच्या दादागिरीमुळे राज्यकर्ते हतबल झाले. या कंपन्यांचा भ्रष्टाचार पाहून आपला देश भ्रष्टाचारी लोकांच्या हातात जाईल याची केजरीवाल यांना भीती वाटू लागली. त्यांनी नोकरीचा राजीनामा देण्याचे ठरवले. त्यांनी डिसेंबर 1999 साली परिवर्तन या सामाजिक संस्थेची स्थापना केली. त्यांनी आयकर, वीज आणि रेशन या तीन मुद्द्यावर संघर्ष करायचे ठरवले. या तीन खात्यातील भ्रष्टाचार संपला पाहिजे त्यासाठी पूर्ण वेळ काम करण्याचा त्यांचा निश्चय झाला. यासाठी माहितीच्या अधिकाराचा मोठा उपयोग होणार होता.

Advertisements

शिक्षण घेत असताना सुनिता नावाच्या शाळेतील सहकारी मुलीशी त्यांचे लग्न झाले. त्यांना मुलगी हर्षिता व मुलगा पुलकित अशी दोन अपत्ये झाली. सुनिताने नोकरी करावी व आपण समाजकार्य करावे असा पक्का निर्णय झाला. दिल्लीतील बोगस रेशन कार्डचे रॅकेट त्यांनी उघडकीस आणले. सुरुवातीला दिल्ली मर्यादित काम करावे असा निश्चय केला. आंदोलन करीत असताना समाजसेवक अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचार निर्मूलन आंदोलनाशी त्यांचा संबंध आला. अण्णांच्या आंदोलनामध्ये त्यांनी स्वतःला झोकून दिले. या काळात दिल्लीमध्ये काँग्रेसचे मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे सरकार होते. हे सरकार पूर्णपणे भ्रष्टाचारात बुडलेले होते. अण्णा हजारे यांचे आंदोलन देशभर गाजले.

अनेक भ्रष्टाचारी मंत्र्यांना या आंदोलनामुळे मंत्रिपदे गमवावी लागली. काही नेते तुरुंगात गेले. याच काळात अरविंद केजरीवाल संपूर्ण भारतात प्रसिद्ध झाले. भ्रष्टाचार निर्मूलन आंदोलनात प्रत्येक राज्यातील कार्यकर्ते सामील झाले. हे आंदोलन जागतिक पातळीवर प्रसिद्ध झाले. अण्णांना दुसरे ‘गांधी’ म्हणून लोक संबोधू लागले. भ्रष्टाचारांच्यावर मोठा दबाव निर्माण झाला. पण समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनातील फुट आणि व्यक्तिकेंद्रित झाल्याने फार काळ टिकले नाही. अण्णांचे वय जास्त झाल्याने आंदोलनावर मर्यादा आल्या. भ्रष्टाचार निर्मूलन आंदोलन प्रसारमाध्यमांनी उचलून धरल्याने ते देशपातळीवर गाजले. आंदोलनाचा जोर कमी झाल्याने केजरीवाल यांचीही लोकप्रियता कमी होत गेली. दिल्ली विधानसभा जिंकून मुख्यमंत्री झालेल्या केजरीवाल यांना नुकतीच सत्ता गमवावी लागली. आदर्श भारत निर्माण करण्याचे केजरीवाल यांचे स्वप्न भंग पावले. खोट्या गुन्ह्यात अडकवून त्यांना बदनाम करण्याचे कारस्थान झाले. प्रसारमाध्यमांनीही भांडवली व्यवस्थेच्या बाजूने राहून केजरीवाल यांना बदनाम केले. एका लढाऊ, हुशार, चारित्र्यसंपन्न नेत्याला प्रसारमाध्यमांनी बदनाम केले.

देशात आता भ्रष्टाचाराने डोके वर काढले आहे. धनाची चोरी चोहोबाजूने होत आहे. देश लुटला जात आहे. निवडून दिलेल्या नेत्यांमधील काही भ्रष्टाचारी आहेत. इंग्रजांनी दीडशे वर्षात जेवढे लुटले नाही त्यापेक्षा जास्त लुटले जात आहे. अफरातफर, कर चोरी, लाच लुटीचे प्रकार होत आहेत. जगाच्या चोवीस टक्के निसर्गसंपत्ती आपल्या देशात असताना देशावर कर्ज कशासाठी ? फसवे आकडे सांगून लोकांना फसवले जाते. परदेशात असलेला काळा पैसा इतर देशानी आणला मग आमचा देश का आणत नाही असा प्रश्न पडतो. मंत्रालय हेच भ्रष्टाचाराचे मूळ केंद्र आहे. भ्रष्टाचाराची सुरुवात तिथूनच होते त्याच्यावर आळा घालण्याची गरज आहे. आमदार, खासदारांना गुणवत्ता, चरित्र, क्षमता पाहून तिकिटे दिल्यास भ्रष्टाचार होणार नाही. मंत्रालयामध्ये अर्जावर नोट लिहिण्यासाठी दर ठरलेले आहेत.

भ्रष्टाचार कमी व्हावा यासाठी अरविंद केजरीवाल यांनी एका पक्षाची स्थापना केली. त्या पक्षाचे नाव आम आदमी पार्टी. केजरीवाल या पक्षाला राजकीय पक्ष न म्हणतात व्यवस्था परिवर्तन आंदोलन म्हणत असत. या पक्षाची स्थापना 26 नोव्हेंबर 2012 या दिवशी करण्यात आली. याच दिवशी स्वतंत्र भारताने देशी स्वतंत्र घटना स्वीकारली. तेवीस लोकांची राष्ट्रीय कार्यकारणी तयार केली व देशातील तीनशे वीस कार्यकर्त्यांचे प्रतिनिधी मंडळ तयार करण्यात आले.

भारतातील कोणत्याही पक्षासारखे विचारात न अडकता महात्मा गांधी यांच्या स्वराज्य कल्पनेनुसार पक्ष स्थापन झाला. देशातील चळवळीतील अनेक दिग्गज नेते या पक्षात सामील झाले. पक्षाचा चार कलमी कार्यक्रम ठरला, १. जनलोकपाल विधेयक संमत करणे २. निवडणुकीतील नकार अधिकार ३. जनतेशी बेइमानी करणाऱ्या लोकप्रतिनिधींना परत बोलवण्याचा अधिकार ४. राजकीय सत्तेचे विकेंद्रीकरण अशी कलमे होती. पक्षाने शिक्षण, सामाजिक सदभाव, अर्थकारण, भूसंपादन, शेतकरी आत्महत्या, नैसर्गिक संपत्ती, आरोग्यसेवा, महिला सुरक्षा यासारखे मुद्दे स्वीकारले. भ्रष्टाचाऱ्यांना हरवणे हा या पक्षाचा ध्येयवाद होता. राक्षसी सत्तेचा गैरवापर करून अरविंद केजरीवाल यांना हरवता येते. पण केजरीवाल यांच्या विषयी लोकांच्या मनात आदराच्या भावना आहेत ही विसरता येणार नाही.

AD1

1 thought on “व्यवस्था बदलण्याचे केजरीवाल यांचे स्वप्न भंगले”

Leave a Comment

error: Content is protected !!