मराठा समाजातील ७५० बेरोजगार तरुणांना उद्योगधंदा, व्यवसाय, स्वयंरोजगार व रोजगारासाठी कर्जपुरवठा
कागल : केडीसीसी बँकेकडून कै. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे ७५ कोटी रुपये अर्थसहाय्य केले असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. मराठा समाजातील ७५० बेरोजगार युवकांना उद्योगधंदे, व्यवसाय, स्वयंरोजगार व रोजगारासाठी हा अर्थपुरवठा केल्याचेही ते म्हणाले.
कागलमध्ये कै. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या लाभार्थ्यांना कर्जमंजुरी पत्रांच्या वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बँकेचे संचालक व आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील- यड्रावकर होते.
भाषणात मंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, मराठा समाजासह ओबीसी, कुणबी, मागास व भटक्या समाजाच्या बेरोजगार तरुणांनाही उद्योगधंदे व व्यवसायासाठी बँक कर्ज पुरवठा करीत आहे. शेतकऱ्यांना पाच लाखांपर्यंत पिककर्ज बिनव्याजी देणारी देशातील ही पहिली व एकमेव बँक आहे असे सांगतानाच ते म्हणाले, शेतीची अर्थव्यवस्था अवलंबून असलेल्या साखर कारखान्यांच्या पाठीशीही बँक पहाडासारखी उभी आहे.
प्रास्ताविकपर भाषणात केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने म्हणाले, केडीसीसी बँक ही कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची वरदायिनी आहे. समाजात बेरोजगारी वाढत असताना बँकेने बेरोजगारांसाठी केलेला हा कर्जपुरवठा एक आशेचा नवा किरण आहे.
बेरोजगारांसाठी ५०० कोटींचा अर्थपुरवठा……..
मंत्री श्री मुश्रीफ भाषणात म्हणाले, बँकेच्यावतीने सर्व प्रकारचा कर्जपुरवठा सुरू आहे. आजमितीला ७५० तरुणांना ७५ कोटी अर्थपुरवठा झाला आहे. आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळासह महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, इतर मागासवर्गीय विकास महामंडळ, वसंतराव नाईक विकास महामंडळ, संत रोहिदास विकास महामंडळ योजनांमधूनही जोपर्यंत सरकार या योजनेचे व्याज देत राहील तोपर्यंत तब्बल ५०० कोटी रुपयांचा कर्ज पुरवठा करण्याचीही बँकेची तयारी आहे.
यावेळी प्रकाशराव गाडेकर, अशोकराव नवाळे, प्रवीणसिंह भोसले, दिनकरराव कोतेकर, रमेश माळी, अनिल चव्हाण, विकास पाटील, रमेश पाटील आदी प्रमुख उपस्थित होते
स्वागत बँकेचे कागल तालुक्याचे विभागीय अधिकारी शंकरराव निंबाळकर यांनी केले. आभार कागल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष विकास पाटील यांनी मानले