कागल: महाराष्ट्र राज्य पायाभूत सेवा विकास महामंडळ (HAM) योजनेअंतर्गत निढोरी ते यळगुड या राज्यमार्ग क्रमांक १९५ च्या काँक्रिटीकरण कामात येणाऱ्या तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणी सोडवण्यासाठी कागलमध्ये महत्त्वपूर्ण संयुक्त आढावा बैठक पार पडली. सांगाव नाका ते ठाकरे चौक आणि छत्रपती शिवाजी महाराज पुतळा (एस.टी. स्टँड) या पट्ट्यात होणाऱ्या कामाची सद्यस्थिती आणि नियोजनावर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीला जिल्हा बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, उपनगराध्यक्ष जयवंत रावण, मुख्याधिकारी अजय पाटणकर पाणीपुरवठा सभापती मा.प्रकाश गाडेकर मा.नगरसेवक मा.चंद्रकांत गवळी, आरोग्य सभापती मा.प्रविण काळबर, गटनेते सतीश घाडगे, गटनेते मा.दीपक मगर, नगरसेवक मा.नवल बोते, नगरसेवक मा.अर्जुन नाईक, नगरसेवक मा.अरुण गुरव, सामाजिक कार्यकर्ते मा.कुमार पिष्टे, रस्ते प्रकल्पाचे प्रोजेक्ट मॅनेजर, एसटी महामंडळाचे अधिकारी, कागल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी तसेच कागल नगरपरिषदेकडे सर्व विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे आणि निर्णय:
अतिक्रमण निर्मूलन: शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे पोलीस बंदोबस्तात नगरपालिकेकडून काढली जातील, असे मुख्याधिकारी अजय पाटणकर यांनी स्पष्ट केले.
जागेचा मोबदला: बाधित खाजगी जागा मालकांना नियमानुसार योग्य मोबदला देण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली.
विभागीय समन्वय: रस्ते कामामुळे विस्कळीत झालेली पाणीपुरवठा वाहिनी, विद्युत खांब आणि वाहतूक कोंडी यावर महावितरण, पोलीस आणि पालिका प्रशासनाने एकत्रित काम करण्याचा निर्धार केला.
वाहतूक नियोजन: कामादरम्यान नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पर्यायी वाहतूक व्यवस्था आणि सुरक्षेच्या उपाययोजनांवर भर देण्यात आला.
“हा प्रकल्प कागल शहराच्या दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. नागरिकांच्या समस्या लक्षात घेऊन सर्व विभागांनी समन्वयाने काम केल्यास प्रकल्पाची गती वाढेल आणि शहरवासीयांना दर्जेदार रस्ते उपलब्ध होतील.” – प्रताप उर्फ भैय्या माने (संचालक, जिल्हा बँक)
नागरिकांच्या सुविधेसाठी ठोस पाऊल
रस्त्याच्या कामामुळे सध्या वाहतुकीचा काही प्रमाणात खोळंबा होत असला, तरी काम पूर्ण झाल्यानंतर कागल नगरपरिषद हद्दीतील पायाभूत सुविधांचा दर्जा सुधारणार आहे. प्रकल्पाचा वेग वाढवण्यासाठी आणि तातडीने उर्वरित कामे मार्गी लावण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी या बैठकीत एकमत दर्शवले.