कागल / प्रतिनिधी : कागल शहरात सुरू असलेल्या गहिनीनाथ उरुसा निमित्त कागल नगरपरिषदेचा आरोग्य विभाग 24 तास कार्यरत आहे. स्वच्छतेचे व आरोग्याचे भक्कम नियोजन करत आहे. त्यामुळे कागल नगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे नागरिकांतून विशेष कौतुक केले जात आहे.

मुख्याधिकारी अजय पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आरोग्य निरीक्षक नितीन कांबळे,अमोल कांबळे यांच्या नियंत्रणाखाली आरोग्य विभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत स्वच्छता मुकादम बादल कांबळे, कौतुक कांबळे, दीपक कांबळे, प्रथमेश कांबळे आदींच्या मदतीने स्वच्छतेचे नियोजन सातत्याने राबवले जात आहे.दहा घंटागाड्या व तीन ट्रॅक्टर-ट्रॉली यांच्या सहाय्याने शहरातील सर्व प्रभागांतून 24 तास कचरा उचलण्याचे काम सुरू ठेवले आहे. दर्गा परिसरात स्वच्छतेवर विशेष भर देत 24 तास सफाई, धुरफवारणी, कीटकनाशक पावडर फवारणी तसेच शौचालयांची नियमित साफसफाई करण्यात येत आहे.


उरुस काळात दर्ग्याचा मुख्य रस्ता तसेच प्रमुख मार्गांची दिवसातून तीन वेळा सफाई करण्यात येत आहे. तसेच शहरातील सर्व प्रभागांमध्ये पावडर फवारणी करून साथीचे रोग उद्भवू नयेत यासाठी आरोग्य विभाग सतत दक्ष आहे.
या स्वच्छता मोहिमेत आरोग्य विभागातील महिला कर्मचारी, घंटागाडी चालक, मदतनीस आणि सफाई कर्मचारी असे एकूण ७५ ते १०० कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहून कागल शहरातील नागरिकांचे आरोग्य निरोगी राखण्यासाठी योगदान देत आहेत. “गहिनीनाथ उरुसा काळात नागरिकांना स्वच्छ आणि निरोगी वातावरण मिळावे, हा आमचा प्रमुख उद्देश आहे. आरोग्य विभागातील सर्व कर्मचारी व अधिकारी आपले काम सेवा तत्परतेने करीत आहेत.