नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या
सागर कोंडेकर यांची तहसीलदार यांच्याकडे मागणी
कागल : कागल तालुक्यातील पाण्याअभावी वाळलेल्या ऊसाचे तात्काळ पंचनामे करून संबंधित शेतकऱ्यांना विनाविलंब नुकसान भरपाई द्या अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने तहसीलदार शिल्पा ठोकडे, तसेच तालुका कृषी अधिकारी भिंगारदिवे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कागल तालुक्यातील नदी,कालवे, विहीरीच्या पाण्यावर हजारो एकरातील पिके अवलंबून आहेत. माञ, पाण्याअभावी तालुक्यातील चिकोञा,दुधगंगा,वेदगंगा परिसरातील शेकडो एकरातील पिके वाळली आहेत.
त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून केलेली मशागत, बियाणे, खते, मजुरी आदी खर्च वाया गेला आहे.तर त्यांना पुन्हा मशागतीसाठी खर्च येत आहे. सध्या,पाऊसही लांबला आहे. त्यामुळे ही नैसर्गिक आपत्तीच असून कोरडा दुष्काळ जाहीर करावा.तसेच, संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ सानुग्रह अनुदान देण्यात यावे.
यावेळी तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी याबाबत वरिष्ठांशी पञवव्यवहार करण्याचे अभिवचन संघटनेच्या कार्यकर्त्यांना दिले. निवेदनावर युवा जिल्हापाध्यक्ष सागर कोंडेकर, राजेंद्र बागल, तानाजी मगदूम, नितेश कोगनोळे, प्रकाश चव्हाण, सुभाष कोंडेकर, सुरेश माळी यांच्या सह्या आहेत.