कोल्हापूर, दि.9: जिल्ह्यात अंमली पदार्थांचे उत्पादन अथवा विक्री होत असल्याचे आढळून आल्यास 8411849922 या व्हॉटस्ॲप क्रमांकावर संदेश अथवा व्हिडीओ पाठवून माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी केले. जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी समितीची बैठक पोलीस अधीक्षक श्री. बलकवडे यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस अधीक्षक कार्यालयात घेण्यात आली.
यावेळी पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, सीपीआरच्या कायदा सल्लागार गौरी पाटील, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त आश्विन ठाकरे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक रवींद्र आवळे, सामाजिक न्याय विभागाच्या समाज कल्याण निरीक्षक कल्पना पाटील, पोस्ट ऑफिसचे प्रसाद तेरेदेसाई, लोहमार्ग पुणे विभागाचे एपीआय व्हि.आर.पाटोळे उपस्थित होते.
जिल्ह्यातील कोणत्याही रासायनिक कारखान्यांमध्ये अंमली पदार्थाचे उत्पादन होणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच बंद असणाऱ्या कारखान्यांमध्येही अशा पदार्थांचे उत्पादन होत नसल्याची तपासणी वेळोवेळी करा, अशा सूचना देऊन पोलीस अधीक्षक श्री. बलकवडे यांनी सातारा, सांगली जंक्शनवर येणाऱ्या रेल्वेमध्ये प्रवासी नसून फक्त बॅगा असतात. यामधून गांजाची तस्करी होत नसल्याची खात्री करण्यासाठी सोलापूर-नांदेड-बल्लाळपूर या भागातून येणाऱ्या रेल्वेमध्ये तपासणी करण्याच्या सूचना त्यांनी रेल्वे पोलीस विभागाला दिल्या.
शाळेच्या 100 मीटर परिसरातील पानटपऱ्यांवर तंबाखू, गुटखा विकला जातो. यासाठी शाळेच्या मुख्याध्यापकांकडून लेखी माहिती पोलीस विभागाने घ्यावी तसेच वैद्यकीय, इंजनिअरींग महाविद्यालयामध्ये बरीचशी मुले परराज्यातून येणारी असतात. त्यामुळे त्यांच्यावर विशेष लक्ष केंद्रीत करा जेणेकरुन तरुण मुले या व्यसनाला बळी पडू नयेत.
आश्रमशाळेतील मुलींबाबत गैरप्रकार घडू नयेत यासाठी समाज कल्याण विभागाने अत्यंत दक्ष रहावे त्याचप्रमाणे स्वयंपाकी, रेक्टरकडून मुलींबाबत गैरवर्तन होणार नाही याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी समाज कल्याण निरीक्षकांना दिल्या. आठवडयातून एकदा रेल्वे स्टेशनवरील पोस्ट विभागाच्या पार्सलचे नार्को डॉगकडून तपासणी करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. मागील बैठकीतील विषयानुरुप सर्व विभागांनी केलेल्या कार्यवाहीचा आढावा त्यांनी यावेळी घेतला.