गोकुळ शिरगाव (सलीम शेख ) : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील गोकुळ शिरगाव जिल्हा परिषद मतदारसंघ पुरुष खुल्या विभागासाठी आरक्षित झाल्यानंतर काँग्रेसमध्ये उमेदवारीसाठी हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर के. डी. पाटील यांचे नाव सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.
शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात गेली २५ वर्षे कार्यरत असलेले के. डी. पाटील हे सौ.अंबूबाई पाटील इंग्लिश स्कूल, गोकुळ शिरगाव ,औद्योगिक वसाहत येथे कार्यरत असून, त्यांच्या कार्यामुळे स्थानिक पातळीवर त्यांची ओळख एक अभ्यासू आणि लोकाभिमुख उमेदवार अशी झाली आहे. पंचक्रोशीत त्यांचा जनसंपर्क दांडगा असून, युवक वर्ग, सामाजिक संस्था व मंडळांचा त्यांना मोठा पाठिंबा लाभत आहे.

काँग्रेसमध्ये सध्या शशिकांत खोत, सागर पाटील, सुदर्शन खोत आणि निशांत पाटील यांचीही नावे चर्चेत असली तरी, नव्या चेहऱ्याला संधी द्यावी, अशी मागणी कार्यकर्त्यांतून जोर धरत आहे. या पार्श्वभूमीवर के. डी. पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जात असून, पक्षश्रेष्ठींनी अंतिम निर्णय घेतल्यानंतर याचा उलगडा होईल. सध्या के.डी पाटील प्रबळ दावेदार मानले जात आहेत.
गोकुळ शिरगावमधील आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसकडून नव्या नेतृत्वाची चुणूक दिसणार का? याकडे पंचक्रोशीत लक्ष वेधले गेले आहे.
 
					