लाखो वृक्षांची लागवड आणि पर्यावरणपूरक औद्योगिक वसाहतीचा संकल्प

गोकुळ शिरगाव (सलीम शेख ) : गोकुळ शिरगाव, शिरोली आणि पंचतारांकित औद्योगिक वसाहती आता केवळ उत्पादन आणि रोजगाराचे केंद्र न राहता, पर्यावरणाची काळजी घेणारी हरित क्षेत्र म्हणून ओळखली जाणार आहेत. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) माध्यमातून यावर्षी पावसाळ्यात या तीनही औद्योगिक वसाहतींमध्ये व्यापक वृक्ष चळवळ राबवण्याचा निर्धार करण्यात आला आहे. या महत्वाकांक्षी उपक्रमांतर्गत लाखो झाडांची लागवड करून पर्यावरणपूरक औद्योगिक वसाहतीचा संकल्प प्रत्यक्षात उतरवला जाणार आहे.

या उपक्रमाच्या अनुषंगाने गोकुळ शिरगाव एमआयडीसीमध्ये पावसाळ्यापूर्वी रस्ता लगतच्या गटारी आणि रस्त्यांवरील स्पीड ब्रेकर दुरुस्त करण्याचे काम पूर्ण झाले आहे. तसेच, सुरक्षिततेच्या दृष्टीने स्पीड ब्रेकरला पांढरे पट्टे मारण्यात आले आहेत. आता या भागात वृक्ष चळवळीच्या माध्यमातून हिरवळ फुलवण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे.

AD1

या वृक्षारोपण मोहिमेची विशेष बाब म्हणजे यात केवळ मोठी झाडेच नव्हे, तर कमी उंचीची आणि खोलवर मुळे न जाणारी तुळस, अडुळसा, विविध वन औषधी वनस्पती, कलमी फळझाडे आणि इतर झुडूपवर्गीय वनस्पतींची लागवड केली जाणार आहे. ही झाडे औद्योगिक वसाहतीमधील विद्युत तारा (एचटी लाईन) आणि युटिलिटी लाईनच्या खालील मोकळ्या जागेत लावली जातील. यामुळे झाडांच्या वाढत्या मुळांमुळे पाइपलाइन किंवा केबल्सना कोणताही धोका पोहोचणार नाही, याची पूर्ण काळजी घेतली जाणार आहे.

या अभिनव दृष्टिकोनमुळे भविष्यात झाडांच्या फांद्या विद्युत तारांना अडथळा निर्माण करणार नाहीत. त्यामुळे युटिलिटी लाईनच्या दुरुस्ती किंवा विस्तारीकरणाच्या वेळी मोठ्या झाडांची तोडणी करण्याची गरज भासणार नाही आणि पर्यावरणाचे संरक्षणही होईल.

गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन, शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन आणि कागल हातकलंगले मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन यांना या महत्त्वपूर्ण उपक्रमात सक्रियपणे सहभागी होण्याचे विशेष आवाहन करण्यात आले आहे. वातावरणातील बदलांमुळे वाढणारे तापमान आणि प्रदूषण ही गंभीर समस्या आहे. यावर मात करण्यासाठी आणि पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी अधिकाधिक वृक्षारोपण करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे सर्व उद्योजकांनी एकत्र येऊन या कार्यात योगदान देण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

गोकुळ शिरगाव, शिरोली आणि कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतींमधील सर्व उद्योजक आणि औद्योगिक संघटना यांनी एकत्र येऊन पर्यावरणपूरक एमआयडीसी साकारण्याचा दृढ निर्धार करावा, हेच या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट आहे, असे आय. ए. नाईक, कार्यकारी अभियंता यांनी सांगितले. त्यांच्या नेतृत्वाखाली देखभाल, पाणीपुरवठा आणि सुशोभीकरण यासाठी कंपन्यांनी सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) अंतर्गत सक्रियपणे कार्य करावे, असेही त्यांनी सूचित केले आहे. जर हा उपक्रम यशस्वी झाला, तर कोल्हापूरचे औद्योगिक क्षेत्र केवळ उत्पादन आणि रोजगारासाठीच नव्हे, तर पर्यावरणपूरक औद्योगिक विकासाच्या मॉडेल म्हणून संपूर्ण राज्यात एक आदर्श निर्माण करेल, यात शंका नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!