दुर्गमानवाडजवळ अज्ञात वाहनाने मोटारसायकलीला ठोकरले
गोरंबे(प्रतिनिधी): गोरंबे (ता. कागल) येथिल माजी सरपंच प्रकाश बाजीराव चौगुले( वय ५७) यांचा मोटरसायकल अपघातात मृत्यू झाला. दुर्गमानवाड (ता. राधानगरी) येथिल विठ्ठलाईदेवीच्या दर्शनासाठी मोटर सायकलवरून गेले होते. दर्शन घेऊन परत येत असताना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी त्यांना कोल्हापुरात सीपीआर रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.
याबाबत अधिक माहिती अशी श्री. चौगुले हे विठ्ठलाई देवीचे देवदर्शन घेवून तारळेकडे येत असताना अज्ञात वाहनाने त्यांच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे ते रस्त्यापासून खाली वीस फूट खोल खड्ड्यात पडले. त्यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. घटनास्थळी ये-जा करणाऱ्या प्रवाशांनी व पाठीमागून आलेल्या गोरंबेच्या ग्रामस्थांनी त्यांना तातडीने मोटारीतून कोल्हापूरला सीपीआर हॉस्पिटलमध्ये आणले. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. रात्री उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं असा परिवार आहे.