कागल पोलिसात गुन्हा
कागल (प्रतिनिधी) : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे अज्ञाताकडून बनावट फेसबुक खाते काढण्यात आल्याची फिर्याद कागल पोलीस ठाण्यात देण्यात आली. अज्ञाता विरुद्ध पोलीसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या बाबतची फिर्याद मंत्री मुश्रीफ यांचे फेसबुक खाते चालविणारे सुशांत बाळासाहेब डोंगळे (रा. शेंदूर ता कागल जि. कोल्हापूर) यांनी दिली आहे.
सुशांत डोंगळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मियालाल मुश्रीफ यांचे हसन मुश्रीफ या नावाने फेसबुक खाते कार्यरत आहे. मंत्री मुश्रीफ यांच्या पुर्व परवानगीने हे खाते मी स्वतः चालवितो. ३० डिसेंबर रोजी अज्ञाताकडून हसन मुश्रीफ यांच्या नावाचे बनावट फेसबुक खाते उघडले आहे.
हे बनावट खाते चालविणाऱ्याने मूळ फेसबुक खात्यावरील अनेक मजकुर, फोटो, व्हीडीओ कॉफी करून जसाच्या तसा बनावट खात्यामध्ये मजकुर वापरत आहे. तसेच या बनावट खाते चालविणाऱ्याने राहूल पिंपळे महाराज (रा. अलिबाग) व रोहीत फराकटे (फराकटेवाडी, ता. कागल, जि. कोल्हापूर) यांच्याशी बनावट खात्यावरून चॅटींगही केले आहे.
या गुन्ह्यातील गुन्हेगाराविरुध्द सायबर क्राईम अंतर्गत गुन्हा नोंद करून घ्यावा. सदर गुन्हेगारांवर योग्य ती कठोर कार्यवाही व्हावी असे फिर्यादित नमूद आहे.