सोमवारी दि. २० रोजी १२.३० वाजता पुन्हा बोलविले आहे
मुंबई, दि. १५ : आज बुधवार दि. १५ रोजी दुपारी १२.३० वाजता ईडीच्या मुंबई कार्यालयात चौकशीसाठी हजर झालो. सव्वाआठ तासांच्या चौकशीत अतिशय योग्य व चांगल्या पद्धतीने उत्तरे देऊन चौकशीला सहकार्य केले आहे. सोमवारी दि. २० दुपारी १२.३० वाजता पुन्हा बोलविले आहे. त्यावेळीही चौकशीला हजर राहून सहकार्य करू, असे स्पष्टीकरण आमदार हसन मुश्रीफ यांनी दिले आहे.
सव्वाआठ तासाच्या चौकशीनंतर रात्री पावणेनऊ बाहेर पडल्यावर आमदार श्री. मुश्रीफ यांना ईडी कार्यालयाच्या बाहेर पत्रकारांनी प्रश्न विचारले.
पत्रकारांनी श्री. मुश्रीफ यांना विचारले की, काय -काय आणि कशा प्रकारचे प्रश्न होते? यावर ते म्हणाले, आत्ता त्यावर बोलणे योग्य नाही. परंतु; चांगल्या पद्धतीने आम्ही उत्तरे देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचे संपूर्ण समाधान करण्याचा प्रयत्न करू आणि त्यांचे संपूर्ण समाधान होईल.
तब्बल सव्वाआठ तास तुमची चौकशी झाली, तरीही तुम्ही इतके फ्रेश आणि आनंदी दिसत आहात. ही चौकशी आनंदी, हसत -खेळत झाली आहे का? या प्रश्नावर श्री. मुश्रीफ म्हणाले, चुकीचे काय केलेलेच नाही. त्यामुळे चौकशी अतिशय चांगली झाली. त्यांनीही चांगले सहकार्य केले, आम्हीही त्यांना सहकार्य केले.