कोरोनामुळे विधवा झालेल्या जिल्ह्यातील महिला शेतकऱ्यांना मोफत बियाणे देण्याच्या उपक्रमाची कृषी मंत्र्यांकडून दखल
कोल्हापूर : कोरोनामुळे विधवा झालेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील महिला शेतकऱ्यांना कृषी विभाग आणि कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने पेरणीसाठी मोफत बियाणे देण्यात येत आहेत. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील 1270 महिला शेतकऱ्यांना 115 क्विंटल सोयाबीन, 62 क्विंटल भुईमूग आणि 92 क्विंटल भात पिकाच्या बियाण्यांचे मोफत वाटप करण्यात येत असून यापैकी भाताचे बियाणे वाटप करण्यात आले आहे. तर भुईमूग व सोयाबीन बियाणे वाटप करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली.
कोल्हापूर जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी कौतुक केले. तसेच राज्यभर हा उपक्रम राबविण्यासाठी प्रयत्न करु, असेही त्यांनी सांगितले. याबाबत बोलताना जिल्हाधिकारी राहुल रेखावार म्हणाले, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.निलम गोऱ्हे कोल्हापूर दौऱ्यावर आल्या असताना कोरोनामुळे विधवा झालेल्या महिलांना सहाय्य करण्याबाबत त्यांनी बैठकीत सुचविले होते. या विचारातून कृषी विभागाने अशा महिला शेतकऱ्यांना मोफत बियाणे देवू, असे सांगितले आणि त्यानुसार प्रयत्न सुरू केले.
कोरोनामुळे पतीच्या निधनाने विधवा झालेल्या महिला शेतकऱ्यांवर संकट ओढवले. या संकटसमयी जिल्हा, जिल्ह्याचं प्रशासन आणि महाराष्ट्र शासन या महिलांसोबत आहे. या महिलांच्या अडी-अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या उद्देशाने कोल्हापूर जिल्ह्यात हा उपक्रम राबविण्यात येत आहे. जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाच्या वतीने जिल्ह्यात हा उपक्रम सुरु आहे. जिल्ह्यातील ज्या महिलांच्या पतीचे कोविडमुळे निधन झाले, अशा विधवा महिलांना ही मदत देण्यात येत आहे.
यासाठी कोल्हापूर बियाणे असोसिएशनने खूप सहकार्य केले. असोसिएशनचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी यात पुढाकार घेतला आणि सर्व बियाणे विक्रेत्यांनाही त्यांनी आवाहन केले. या आवाहनामुळे 1270 हून अधिक महिलांना सोयाबीन, भुईमूग आणि भात पिकांचे बियाणे मोफत देण्यात येत आहे, असे जिल्हाधिकारी श्री रेखावार यांनी सांगितले. कृषी विभाग, महाबीज व जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून भाजीपाला बियाण्यांच्या मिनी किट्सचे देखील या महिलांना वाटप करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सांगितले.