मुरगूड ( शशी दरेकर ):
येथील शिवराज विद्यालय ज्युनिअर कॉलेज मुरगूड मध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त उपमुख्याध्यापक, वृक्षमित्र प्रविण सुर्यवंशी यांच्या वतीने शाळेतील ३० गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना गणवेश वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जय शिवराय एज्युकेशनचे कार्यवाहक आण्णासो थोरवत होते. तर प्राचार्य व्ही बी खंदारे,व्होकेशनल विभाग प्रमुख आर बी पाटील, उपप्राचार्य ई व्ही चौगुले,कोजिमाशि चे संचालक अविनाश चौगले, एकनाथ आरडे, यांची प्रमुख उपस्थिती होती.
१९९२ साली न्यू इंग्लिश स्कूल मांगनूर येथील विनाअनुदानित शाळेवर श्री सुर्यवंशी यांची नोकरी सुरू झाली. त्यावर्षी त्यांनी स्वातंत्र्यदिना निमित्त एका गरजू विद्यार्थ्याला एक गणवेश दिला.
आणि या स्तुत्य उपक्रमाचा शुभारंभ झाला.गेली ३५ वर्ष स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिन या राष्ट्रीय सणाच्या प्रसंगी हा सातत्यपूर्ण उपक्रम त्यांनी चालू ठेवला असून, श्री सूर्यवंशी हे ३१ मे २०२६ रोजी सेवानिवृत्त होत आहेत या कार्यक्रम प्रसंगी आपला हा उपक्रम तहयात सातत्यपूर्ण सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी यावेळी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
या कार्यक्रमास प्रा ए ए पाटील, बी वाय पाटील, डी आर लोखंडे,आर ए जालीमसर,आर आर चव्हाण,पी एम फासके, के डी कुदळे,पी डी ढोणुक्षे,एन एच चौधरी, सौ एल पी सारंग,एस् डी चौगले,सौ.एम व्ही लोंढे, सौ.आर व्ही बिरंबोळे, आदींसह शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वागत प्रास्ताविक पी डी रणदिवे यांनी, सूत्रसंचालन एस एस पाटील यांनी तर आभार एस एस मुसळे, यांनी मानले.
श्री सुर्यवंशी यांनी आपल्या वनश्री मोफत रोपवाटिकेच्या माध्यमातून १९९७ ते २०२५ या तीस वर्षाच्या कालावधीमध्ये ४ लाख ६० हजार रोपांचे मोफत वाटप केले असून तीन कोटी बियांचा संग्रह व त्यांची परिसरातील डोंगर माथ्यावरून बियांची हवाई पेरणी असे उपक्रम प्रत्येक वर्षी राबवले जात आहेत. सन २००३ सालापासून वृक्ष रक्षाबंधन हा अनोखा उपक्रम ते मुरगूड शहर मित्र मंडळाच्या माध्यमातून राबवत आहेत. तसेच २००४ सालापासून गाडगेबाबा पुण्यतिथी निमित्त निराधार निराश्रीतांना थंडीच्या दिवसात ब्लॅंकेटचे वाटप केले जाते असे अनेक सामाजिक उपक्रम त्यांचे सातत्यपूर्ण सुरू असून त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना अनेक संस्थांनी पुरस्काराने सन्मानित केले आहे.
श्री सूर्यवंशी यांनी पर्यावरण संवर्धनाच्या कार्यासाठी १९९७ साली वनश्री मोफत रोपवाटिकेची स्थापना केली रोपवाटिकेतून रोपांची निर्मिती करून केली त्याचे मोफत वाटप सुरू केले आहे. ते १९९५ पासून समाजवादी प्रबोधिनी या चळवळीतील प्रबोधनपर संघटनेमध्येही कार्यरत होते. मुरगूड शहर रोटरी क्लब मध्ये त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. तसेच पर्यावरण संवर्धनाच्या चळवळीचा एक भाग म्हणून त्यांनी आपल्या मुरगूड शहर निसर्ग मित्र मंडळाची ही स्थापना केली आहे. तसेच ते हुतात्मा तुकाराम वाचनालयाचे संचालक होते. सन २००८ पासून ते कोल्हापूर जिल्हा सहकार बोर्डाचे संचालक म्हणून कार्यरत आहेत. त्याचबरोबर विविध सामाजिक चळवळी,संस्थां, संघटनांमधून ते नेहमीच सक्रिय सहभाग घेतात मुरगूड शहर पत्रकार संघाचे सचिव पद भूषवले आहे.सध्या ते साहित्य,सांस्कृतिक, व सामाजिक क्षेत्रातील शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर जिल्हा जळगाव या संस्थेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत.
