अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते ३२ लाखांच्या धनादेशाचे वाटप
कोल्हापूर : मृत शेतकऱ्यांच्या वारसदारांना केडीसीसी बँकेत विमा रक्कमेच्या धनादेशांचे वाटप झाले. बँकेचे अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते संचालक मंडळाच्या बैठकीत हे वितरण झाले.
याबाबत अधिक माहिती अशी, बँकेने किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत स्वभांडवलामधून अडीच लाख शेतकऱ्यांचा प्रत्येकी दोन लाख रुपयांचा विमा उतरविला होता. तसेच बँकेने सन २०२१-२०२२ सालाकरिता इफ्को टोकियो इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून किसान क्रेडिट कार्डधारक अडीच लाख शेतकऱ्यांचा प्रत्येकी दोन लाख विमासुरक्षेचा विमा उतरविला आहे. विमा हप्त्याची तोशिस शेतकऱ्यांना लागू न देता बॅंकेने ही रक्कम नफ्यातून भरली आहे. आत्तापर्यंत मृत शेतकर्यांच्या वारसांना दीड कोटीहून अधिक विमा रक्कम मिळाली आहे.
भाषणात मंत्री श्री मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी हा केडीसीसी बँकेचा आत्मा आहे. शेतातील कामे करताना सर्पदंश, विजेचा धक्का, औषध फवारणी अशा कारणांमुळे तसेच अपघाताने शेतकऱ्यांचे दुर्दैवी मृत्यू होत असतात. अशा संकटग्रस्त परिस्थितीत त्यांच्या कुटुंबियांना हातभार लागावा म्हणून बँकेने प्रत्येक शेतकऱ्याला दोन लाख रुपये विमासुरक्षेची योजना सुरु केली आहे.
संचालक मंडळाच्या बैठकीत महादेव घाटगे -पोर्ले, विठ्ठल तुपारे- मजरे कारवे, प्रसाद पाटील -कुरूंदवाड, अनुसया पवार -विजने, अण्णासो हणमंत -हेरले, रामचंद्र पाटील -निगवे खालसा, सोमनाथ पाटील- सरोळी, तुकाराम निंबाळकर- हसुर सासगिरी, एकनाथ पाटील -महागाव, ज्ञानू ढेरे पाटील- कुर्डू, बापुसो जाधव -हनमंतवाडी, सचिन पाटील- म्हाकवे, वसंत कुपले -कोनोली, गणपती ताकमारे- कोगील बुद्रुक, बाजीराव पाटील -नांदगाव या मृतांच्या वारसदारांना धनादेश देण्यात आले.
यावेळी उपाध्यक्ष आमदार राजूबाबा आवळे, माजी खासदार डॉ. श्रीमती निवेदिता माने, आमदार पी. एन. पाटील, माजी आमदार अमल महाडिक, प्रताप उर्फ भैय्या माने, रणजीतसिंह पाटील, सुधिर देसाई, रणवीरसिंग गायकवाड, विजयसिंह माने, सौ. श्रुतिका काटकर, सौ स्मिता गवळी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने आदी संचालक उपस्थित होते.