कोल्हापूर, दि. 18 : ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी’ अभियाना अंतर्गत जिल्ह्यामध्ये शुक्रवार दिनांक 25 ऑगस्ट रोजी एक दिवसीय शिबीर होणार आहे. या अभियानातर्गंत जास्तीत जास्त दिव्यांग व्यक्तींनी त्यांच्या प्रलंबित शासकीय कामांबाबतचे अर्ज सादर करावेत तसेच शिबीचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे यांनी केले आहे.
दिव्यांग बांधवांच्या अडचणी सोडवण्यासाठी जिल्हास्तरावर शासनाच्या सर्व विभागांचे अधिकारी, सर्व शासकीय यंत्रणा एकाच ठिकाणी उपस्थित राहून दिव्यांगांच्या तक्रारी जाणून घेऊन त्याच ठिकाणी कामाचा निपटारा करण्यासाठी ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी’ हे अभियान राबविण्यात येत आहे.
जिल्ह्यातील सर्व दिव्यांग व्यक्तींना आपले किंवा आपल्या कुटुंबातील व्यक्तींचे शासकीय कार्यालयातील प्रलंबित काम व त्याबाबतचा तपशील तालुकास्तरावरील शासकीय कार्यालयांमध्ये अथवा तालुका स्तरावरील पंचायत समित्यांमध्ये तसेच दिव्यांग शाळा, दिव्यांग संस्था संघटना यांच्याकडे विहित नमुन्यातील अर्ज प्रलंबित बाबींशी निगडित पूरक कागदपत्रांसह सादर करावा. विहित नमुन्यातील अर्जांबाबत जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर, कक्ष क्रमांक १४ अथवा संपर्क क्रमांक ०२३१-२९५०१६२ वर संपर्क साधावा, असेही श्री. घाटे यांनी कळविले आहे.