मुरगूड ( शशी दरेकर )
कागल तालुक्यातील राजकारणात प्रभावी ओळख असलेल्या पाटील कुटुंबीयातील तिसरी पिढी आता सक्रिय राजकारणात उतरल्याने तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. म्हाकवे जिल्हा परिषद मतदार संघातून शिवसेना शिंदे गटातून दिग्विजय प्रविणसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज आज दाखल केला.
या मतदारसंघातून बिद्रीचे माजी उपाध्यक्ष प्रविणसिंह पाटील व मुरगूड नगरपालिकेच्या विद्यमान नगराध्यक्षा सुहासिनीदेवी पाटील यांचे सुपुत्र दिग्विजय पाटील आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून यामुळे म्हाकवे जिल्हा परिषदेत राजकारणाला नवी दिशा मिळणार असल्याचे बोलले जात आहे. दिग्विजय पाटील हे तरुण,सुशिक्षित आणि सामाजिक जाण असलेले नेतृत्व म्हणून ओळखले जाते. मागील काही वर्षांपासून त्यांनी म्हाकवे व कापशी मतदार संघातील विविध गावांमध्ये सामाजिक उपक्रम, युवक संघटन, शैक्षणिक प्रश्न,आरोग्य व शेतकरी प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे.विशेषतः युवक वर्गात त्यांची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येत आहे.
कै.विश्वनाथराव पाटील तसेच प्रविणसिंह पाटील कुटुंबीयांचे कागल तालुक्यातील राजकारणात तसेच सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान राहिले आहे. यांनी आपल्या कार्यकाळात सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देत विकासात्मक कामांचा ठसा उमटवला आहे. त्याच परंपरेचा वारसा पुढे नेत दिग्विजयसिंह यांनी जनतेशी थेट संपर्क साधत विश्वासार्ह नेतृत्व उभे केले आहे.आज होणाऱ्या उमेदवारी अर्ज दाखल कार्यक्रमासाठी म्हाकवे जिल्हा परिषद परिसरातील कार्यकर्ते व माजी खासदार संजयदादा मंडलिक यांच्या नेतृत्वाखाली साध्या पद्धतीने अर्ज दाखल केला
अर्ज दाखल करताना मुरगूड सहकारी बँकेचे व्हा. चेअरमन वसंतराव शिंदे ,बोरवडे चे युवा नेते बालाजी फराकटे, नगरसेवक सत्यजित पाटील ,आनंदराव पाटील कुरणी, साताप्पा पाटील यमगे, सम्राट मसवेकर,विश्वास चौगले चिमगाव, किशन कापशे आवचितवाडी विजय मेंडके आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
दिग्विजयसिंह पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की म्हाकवे मतदार संघातून सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी, युवक, महिला आणि वंचित घटकांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठीच मी निवडणुकीच्या मैदानात उतरलो आहे.विकास, पारदर्शकता आणि सर्वांना सोबत घेऊन पुढे जाणे हेच माझे उद्दिष्ट आहे.

पाटील कुटुंबीयातील तिसरी पिढी राजकारणात सक्रिय झाली असून चारही जि. प. मतदार संघात पाटील गटाला मानणारा वर्ग आहे. त्यातच मंडलिक- पाटील या युतीने मुरगूड नगरपालिका निवडणुकीत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. त्यामुळे ही निवडणूक अधिक चुरशीची होणार असून आगामी काळात पाटील यांची भूमिका निर्णायक ठरेल. अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.