जीव धोक्यात घालून सेवा! प्रशासनाचे दुर्लक्ष, रुग्णसेवेवर परिणाम
सिद्धनेर्ली : कागल तालुक्यातील सिद्धनेर्ली येथील प्राथमिक आरोग्यवर्धिनी केंद्राच्या इमारतीची निर्मिती सुमारे गेल्या ३५ ते ४० वर्षां पूर्वीची आहे. दुरुस्ती न झाल्याने सध्या तिची अवस्था अत्यंत धोकादायक बनली आहे. जीर्ण झालेल्या या मोडकळीस आलेल्या इमारतीत डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांना अक्षरशः जीव धोक्यात घालून रुग्णसेवा करावी लागत आहे, तर दुसरीकडे डॉक्टरांसाठी बांधलेल्या निवासस्थानांची अवस्था पूर्णपणे बिकट झाल्यामुळे डॉक्टर परगावी राहून ये-जा करत असल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे.
सिद्धनेर्ली येथील हे केंद्र परिसरातील लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. येथे दररोज सरासरी ८० ते १४० रुग्ण उपचारांसाठी येत असतात. विशेष म्हणजे, दर महिन्याला ८ ते १० गर्भवती महिला येथे प्रसूतीसाठी येतात, त्यापैकी ४ ते ६ महिलांची प्रसूती याच केंद्रात केली जाते. सध्याही सुमारे १० ते १२ रुग्ण या इमारतीत ॲडमिट आहेत आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. एवढी मोठी रुग्णसंख्या असूनही, आरोग्य केंद्राच्या इमारतीची आणि तेथील सोयीसुविधांची झालेली दुरवस्था प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे झाली असल्याचे चित्र समोर आले आहे.

केंद्रातील डॉक्टरांना राहण्यासाठी बांधलेली निवासस्थाने पूर्णपणे मोडकळीस आली आहेत. दरवाजे तुटले असून भिंतींना तडे गेले आहेत. यामुळे डॉक्टरांना येथे राहणे शक्य नसल्यामुळे ते परगावी राहतात व कामासाठी रोज सिद्धनेर्लीला ये-जा करतात. यामुळे कामाच्या वेळी त्यांची गैरसोय होत असून, त्यांच्या कामाच्या वेळेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.
या आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीसाठी आणि डॉक्टरांच्या निवासस्थानासाठी नूतनीकरणाचा प्रस्ताव प्रशासनाकडे दाखल करण्यात आला आहे. मात्र, हा प्रस्ताव अद्यापही मंजुरीसाठी प्रलंबित असल्याने नागरिकांमध्ये आणि आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे. प्रशासनाने त्वरित या गंभीर बाबीची दखल घेऊन निधी मंजूर करावा आणि आरोग्य केंद्राचे नूतनीकरण लवकरात लवकर सुरू करावे, अशी मागणी सिद्धनेर्ली ग्रामस्थांकडून होत आहे.
रुग्णांचे मत: ‘उपचार उत्तम, पण जेवनाची सोय नाही!’
परिसरातील 6 ते 7 उपकेंद्र या केंद्राच्या अंतर्गत येत असल्याने परिसरातील अनेक रुग्ण येथे उपचार घेतात.सदर दवाखान्यामध्ये उपचार घेत असलेल्या काही रुग्णांशी संवाद साधला असता, त्यांनी येथील डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांकडून मिळणाऱ्या सेवा व उपचारांबद्दल समाधान व्यक्त केले. मात्र, येथे उपचारासाठी ॲडमिट असलेल्या रुग्णांसाठी जेवण अथवा खाद्यपदार्थ तयार करण्याची कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्याने पेशंट्सची तसेच त्यांच्या नातेवाइकांची मोठी कुचंबणा होत असल्याचे त्यांनी बोलून दाखवले. उपचारासोबत जेवणाची सोय झाल्यास रुग्णांना मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
दुपारी केंद्रात कर्मचाऱ्यांची उपस्थिती अत्यंत कमी !
केंद्राच्या भेटीदरम्यान, दुपारच्या वेळेस एकूण सुमारे १६ कर्मचाऱ्यांपैकी केवळ ४ ते ५ स्टाफच उपलब्ध असल्याचे निदर्शनास आले. याबाबत विचारणा केली असता, उर्वरित स्टाफपैकी काही कर्मचारी कागल येथील रुग्णालयात रुग्णांना सोडण्यासाठी गेले आहेत, तर काही कर्मचारी इतर कार्यालयीन कामांसाठी बाहेर गेले आहेत, असे सांगण्यात आले. या वेळेस फक्त मुख्य आरोग्य अधिकारी आणि इतर २ ते ३ स्टाफच दवाखान्यात उपलब्ध असल्याचे दिसून आले.