बातमी

यशिला पार्कचे नागरिक राष्ट्रवादीला पाठबळ देतील – आम. हसन मुश्रीफ

बगीचासह साकव व डांबरीकरणाच्या एक कोटी ६५ लाखांच्या कामाचा प्रारंभ

कागल, दि.१४: यशिला पार्कचे नागरीक येत्या नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पाठबळ देतील, असा विश्वास आमदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. कागलमधील यशिला पार्क या उपनगरातील विकासकामांच्या प्रारंभ कार्यक्रमात आमदार श्री. मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

यावेळी यशिला पार्कमधील एक कोटी २० लाखांचा बागबगीचा, ३५ लाखांचे ओढ्यावरील साकव, दहा लाखांचा रस्ता खडीकरण व डांबरीकरण, असे एक कोटी, ६५ लाखांच्या विकासकामांचा प्रारंभ मान्यवरांच्या हस्ते झाला.

केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने म्हणाले, राजकीय विरोध ठीक आहे. परंतु; कोणी मस्तीची भाषा बोलत असेल, तर ती चालणार नाही. संघर्ष आमच्या पाचवीलाच पुजलाय. ही लढाई आता थांबणार नाही, असेही ते म्हणाले.

माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर म्हणाले, विकासकामातून आणि गोरगरिबांच्या कल्याण योजनातून खरे रामराज्य आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी आणले आहे. काहीजण त्याला दृष्ट लावण्याचा प्रयत्न करीत आहेत.

प्रवीण काळबर म्हणाले, आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी कागलमधील उपनगरीनगरातील नागरिकांच्या समस्या आणि गार्‍हाणी त्यांच्या घरादारापर्यंत जाऊन ऐकली आणि त्या समस्यांचा निपटारा करण्यासाठी त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करून आणलेला आहे. असे उपनगरनिहाय जाऊन समस्या ऐकणारे व सोडवणारे आमदार श्री. मुश्रीफसाहेब हे राज्यातील पहिले व एकमेव नेते असतील.

स्वागत व प्रास्ताविक परवाना संजय चितारी म्हणाले, पाच वर्षांपूर्वी पराभूत होऊनही जनतेशी बांधिलकी म्हणून सामाजिक कार्यात कार्यरत आहोत. विरोधी पक्षातील निवडून आलेले नगरसेवक पाच वर्षात दिसले तरी काय? असा सवाल त्यांनी यावेळी केला. शाहू साखर कारखान्याच्या काजळी व मळीच्या पाण्यामुळे येशीला पार्कसह शाहू कॉलनी, श्रमिक वसाहत, श्रीमंत जयसिंगराव घाटगे पार्क येथील जनजीवनावर परिणाम होत आहे. कारखान्याने या प्रदूषणाचा तातडीने बंदोबस्त करावा.

यावेळी व्यासपीठावर संदीप भुरले, शशिकांत नाईक, ॲड. संग्राम गुरव, रावसाहेब चव्हाण, श्री. रत्नाकर, श्री. सामंत, सुरेश पाटील, सौ. सुषमा पाटील, पंकज खलीफ आदी प्रमुख उपस्थित होते.

स्वागत श्री. रत्नाकर यांनी केले. प्रास्ताविक श्री. धामण्णा सर यांनी केले. सूत्रसंचालन निशांत जाधव यांनी केले. आभार पंकज खलीप यांनी मानले.
…………………..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *