सिद्धनेर्ली परिसरात अघोरी विद्येचे पुन्हा फुटले पेव

नदीकाठी खिळे टोचलेली लिंबे अन् पूजा साहित्य आढळल्याने खळबळ

सिद्धनेर्ली : सिद्धनेर्ली आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून अघोरी आणि अनिष्ट प्रथांनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. काही वर्षांपूर्वी या भागात अशाच प्रकारचे मोठे जाळे पसरले होते, ज्याबाबत ‘पुढारी’ने वृत्तमालिका प्रसिद्ध करून सविस्तर प्रकाश टाकला होता. त्या वेळी प्रशासकीय धाक आणि सामाजिक जागृतीमुळे या प्रकारांना मोठ्या प्रमाणात आळा बसला होता. मात्र, आता पुन्हा एकदा या अघोरी कृत्यांचा सुळसुळाट सुरू झाला असून, नदीकाठी आढळलेल्या विचित्र साहित्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे.

Advertisements

नुकतेच दूधगंगा नदीच्या पात्रात आणि काठावर अघोरी विधींचे धक्कादायक पुरावे समोर आले आहेत. नदीकाठी सुमारे 15ते 16 लिंबू आढळून आले असून, या लिंबांवर कागद गुंडाळून त्यावर संबंधित व्यक्तींची नावे लिहिलेली आहेत. विशेष म्हणजे, या नावांवरच खिळे आणि टाचण्या टोचण्यात आल्याचे दिसून येत आहे. याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात तांदूळ, मूग,काळे तीळ, लवंग आणि हळदी-कुंकू यांसारखे पूजा साहित्य विखुरलेल्या अवस्थेत टाकण्यात आले आहे. या प्रकारामुळे परिसरात पुन्हा एकदा करणी आणि वशीकरणासारख्या अघोरी विद्यांनी डोके वर काढल्याचे स्पष्ट होत आहे.

Advertisements

सध्या सिद्धनेर्लीसह परिसरात भूत काढणे, भांडण-तंटा मिटवणे, कौटुंबिक शांतता लाभणे, लग्न जमवणे आणि अपत्य प्राप्तीसाठी अडाणीपणातून अशा मार्गांचा अवलंब केला जात आहे. यासाठी रात्रीच्या वेळी स्मशानभूमी, नदीकाठ आणि निर्जन स्थळांची निवड करून चित्रविचित्र विधी केले जात आहेत. अंगारे-धुपारे आणि गंडेदोरे देण्याचे प्रकार जोरात सुरू असून, या अंधश्रद्धेच्या जाळ्यात अनेक कुटुंबं अडकत चालल्याने सामाजिक स्वास्थ्य धोक्यात आले आहे. सकाळी कामासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना हे अघोरी साहित्य दिसत असल्याने परिसरात कमालीची घबराट निर्माण झाली आहे.

Advertisements

या विकृतीचा इतिहास पाहता, दोन वर्षांपूर्वी याच दूधगंगा नदीपात्रात मानवी कवट्या सापडल्याची खळबळजनक घटना घडली होती. त्या वेळी अघोरी प्रकारांसाठीच या कवट्यांचा वापर करण्यात आल्याचे निष्पन्न झाले होते. गावाच्या जवळच नदीकाठ आणि स्मशानभूमी असल्याने या ठिकाणांचा गैरफायदा काही समाजकंटक आणि भोंदू बाबा घेत असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. जुन्या घटनांच्या आठवणी आणि आता पुन्हा सापडलेली खिळे टोचलेली लिंबे यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.

अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची कडक अंमलबजावणी करून या विकृतींना तातडीने आवर घालावा, अशी मागणी आता सिद्धनेर्ली परिसरातून होत आहे. प्रशासनाने आणि पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून अशा प्रकारच्या अघोरी कृत्यांमध्ये गुंतलेल्या व्यक्तींचा छडा लावणे गरजेचे बनले आहे. ही भोंदूगिरी वेळीच रोखली नाही, तर परिसरात मोठी सामाजिक हानी होण्याची भीती सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केली आहे.

AD1

Leave a Comment

error: Content is protected !!