बारा वर्षांच्या जिद्दीनंतर भरत झाला दहावी पास !

कोल्हापूर (सलीम शेख ) : शिक्षणाला वयाचं बंधन नसतं, हे भरत कांबळे या तरुणानं खरं करून दाखवलं आहे. तब्बल बारा वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर भरतनं दहावीची परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण केली आहे. प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षणाची आस सोडली नाही आणि योग्य मार्गदर्शनामुळे आज भरतच्या चेहऱ्यावर आनंदाश्रू आणि आत्मविश्वास दिसत आहे.
भरतचं बालपण अत्यंत संघर्षमय परिस्थितीत गेलं.

Advertisements

आई-वडिलांचं आधार नसताना मिळेल ते काम करत आपलं आयुष्य जगावं लागलं. मात्र, त्याच्या मनात शिक्षणाची ज्योत सतत तेवत होती. २०१२ साली तो दहावीच्या परीक्षेत काही विषयांमध्ये नापास झाला. त्यानंतर अनेक वर्षं त्याला पुन्हा परीक्षा देणं शक्य झालं नाही.

Advertisements

अशा परिस्थितीत भरतच्या आयुष्यात कोल्हापूर महावितरण विभागाचे जनसंपर्क अधिकारी विश्वजीत भोसले देवदूत बनून आले. दोघांची भेट झाल्यानंतर विश्वजीत सरांनी भरतची शैक्षणिक पार्श्वभूमी जाणून घेतली. ‘प्रत्येकानं जास्तीत जास्त शिक्षण घ्यावं,’ या विचारांचे भोसलेंनी भरतला पुन्हा दहावीचा फॉर्म भरण्यासाठी प्रोत्साहित केलं.

Advertisements

सरांच्या मार्गदर्शनाखाली भरतनं तयारी केली आणि पहिल्याच प्रयत्नात राहिलेले दोन विषय यशस्वीरित्या पूर्ण केले. तब्बल बारा वर्षांनंतर भरत दहावी पास झाला!  निकाल लागल्यानंतर भरतला स्वतःच्या यशावर विश्वास बसत नव्हता.

दहावी पास झाल्यानंतर भरतच्या मनात आता बारावी आणि त्यानंतर पदवी शिक्षण घेण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली आहे. त्याच्या आत्मविश्वासात मोठी वाढ झाली आहे आणि आता तो पुढील शिक्षणासाठी चांगल्या कॉलेजच्या शोधात आहे.
या आनंददायी क्षणी भरतला हसावं की रडावं, हेच कळेनासं झालं होतं. विश्वजीत भोसले यांनी आपल्या सासूबाईंच्या हस्ते आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत भरतचा यथोचित सन्मान केला. यावेळी विश्वजीत सरांच्या चेहऱ्यावर एक वेगळं समाधान स्पष्ट दिसत होतं.

या प्रेरणादायी घटनेतून हेच सिद्ध होतं की, जर योग्य मार्गदर्शन आणि जिद्द असेल, तर कोणतंही ध्येय अशक्य नसतं. विश्वजीत भोसले यांच्या सामाजिक बांधिलकीला आणि भरतच्या जिद्दीला सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

AD1

Leave a Comment

error: Content is protected !!