सिद्धनेर्ली/ प्रतिनिधी – बाजारातील वाढत्या स्पर्धेमुळे ग्राहक हा केंद्रबिंदू झाला आहे. या स्पर्धेतून होणारी ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी ग्राहक तक्रार निवारण मंच उपयुक्त आहे. ग्राहकांनी आपल्या हक्काबद्दल जागृत राहावे.यासाठी ग्राहकांचे हित जोपासणारी व्यवस्था निर्माण होणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन ग्राहक कल्याण फाऊंडेशनचे जिल्हा उपाध्यक्ष भास्कर चंदनशिवे यांनी केले.
सिद्धनेर्ली ता. कागल येथे प्रियदर्शनी इंदिरा हायस्कूल मध्ये ग्राहक दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात चंदनशिवे बोलत होते. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका सुनंदा पवार होत्या.
ते पुढे म्हणाले ग्राहकांचे महत्त्व, त्यांचे हक्क आणि जबाबदाऱ्यांबद्दल ग्राहकांमध्ये जागरूकता झाली पाहिजे.ग्राहकांना त्यांचा हक्क मिळावा यासाठी ग्राहक संरक्षण कायदा अंमलात आला आहे. या कायद्यांतर्गत कोणताही ग्राहक कोणत्याही प्रकारच्या अन्यायकारक व्यापाराची तक्रार करू शकतो.
ग्राहक कल्याण फाउंडेशनचे तालुका उपाध्यक्ष संजय बल्लाळ यांनी विद्यार्थी हा शैक्षणिक संस्थेचा ग्राहक असतो. गुणवत्तेबाबत फसवणूक झाल्यास विद्यार्थीही ग्राहक मंचाकडे तक्रार करू शकतो असे त्यांनी सांगितले.
यावेळी ग्राहक कल्याण फाऊंडेशनचे कार्याध्यक्ष श्रीकांत पाटील, अध्यापक भाऊसाहेब लाड यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी फाउंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या रांगोळी आणि निबंध स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देण्यात आले. उपस्थित मान्यवरांच्या शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन विठ्ठल भोपळे यांनी तर आभार दिपाली पाटील यांनी मानले.
कार्यक्रमास स्नेहल पाटील, रमेश पाटील,सखाराम घराळ, अरविंद मगदूम, रमेश निकम , रमेश कांबळे, सरोजा पाटील, भीमराव माने, संगीता अडूरे, कुंदन कांबळे आदीसह ग्राहकल्याण फाउंडेशनचे पदाधिकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.