मुरगुड (शशी दरेकर) : मुरगुड ता.कागल येथील निढोरी पुलाजवळील स्मशानभूमीतील शेड मोडकळीस आल्याने येथील स्मशान भूमीस मरणकळा असल्याचे विदारक चित्र पहावयास मिळत आहे. मुळात नाका नंबर एक पासून तब्बल एक किलोमीटर लांब असलेले ही स्मशानभूमी सध्या अखेरच्या घटका मोजताना दिसत आहे. शेडच्या वरील लोखंडी पाईप गंजल्याने त्या केव्हाही वरच्या पत्र्यासह तुटून पडण्याची शक्यता आहे. वरचे पत्रेही खराब झालेले आहेत दोन लोखंडी बेडची जागा उपलब्ध असताना पालिकेने केवळ एकाच बेडची सुविधा उपलब्ध केलेली आहे. हा बेड ही पूर्णता खराब झालेला आहे.
मुळात सखल भागात बांधलेली ही स्मशानभूमी पावसाळ्यात पुराच्या पाण्याखाली जाते. यामुळे या स्मशानभूमीची उंची वाढवने गरजेचे आहे. हीच अवस्था मुरगुड वाघापूर रोड दत्त मंदीराजवळील स्मशानभुमीची आहे. येथील निकृष्ट बांधकामाबद्दल तक्रार झाल्यानंतर गेली चार महिने येथील तटबंदीचे काम पूर्णता रखडले असून पालिकेने बांधलेल्या खोल्यांची दयनीय अवस्था पहावयास मिळत आहे. सध्या पालिकेवर प्रशासक नियुक्त असल्याने सदर कामाची प्रशासकांनी वेळीच दखल घेऊन पावसाळ्यापूर्वी दोन्ही स्मशानभूमींची डागडुजी करावी. अशी मागणी नागरिकांतून होत आहे.