लिंगनूर ते दाजीपूर या रस्त्यावर अनेक अपघात घडले त्यात अनेकांचे बळी गेले
मुरगूड (शशी दरेकर ): लिंगणुर ते दाजीपूर हा ७० की.मी.च्या रस्त्याची गेल्या कित्येक दिवसापासून दयनीय अवस्था झाली असताना इकडे कोणीच लक्ष देत नव्हते. त्यामुळे मुरगूड शहर पत्रकार संघाने रस्ता रोखो आंदोलनाचा पवित्र घेतला व आज पुकारलेल्या आंदोलनाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. तर या आंदोलनात २० गावातील सर्व पक्षीय प्रतिनिधी व ग्रामस्थ सहभागी झाले होते. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी या आंदोलनाची सखोल माहिती घेतली. आणि या प्रश्नी तातडीने उच्चस्तरीय समितीची बैठक घेण्याचे आश्वासन दिल्या नंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. जिल्हाधिकार्याच्या वतीने त्यांचे प्रतिनिधी म्हणून कागलच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी निवेदन स्वीकारले. सुमारे चार तास चाललेल्या या आंदोलनात उंदरवाडी मुदाळ तिट्टा पासून लिंगनूर पर्यंत नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी ठेकेदार कंपनीचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. मार्च २०१९ ची हायब्रीड अँन्यूटी
या तत्त्वानुसार लिंगनूर ते दाजीपूर या ७० किलोमीटर लांबीच्या २२१ कोटी खर्चाच्या या महत्त्वाच्या आंतरराज्य मार्गाचे काम प्रत्यक्षात सुरू झाले होते.मात्र मुदत संपून अवघे ३५ टक्के काम पूर्ण झाल्यामुळे व तेही निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे सुमारे पंचवीस गावात कंपनीच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या.अनेक वेळा विविध गावाने आंदोलने केली होती.मात्र त्याची दखल कंपनीने किंवा महाराष्ट्र शासनाच्या बांधकाम विभागाने तसेच लोकप्रतिनिधींनी घेतली नाही.
त्यामुळे मुरगूड शहर पत्रकार संघाने रस्ता रोखो आंदोलनाची हाक दिली होती. त्यास अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.
प्रथम या आंदोलनाची पार्श्वभूमी पत्रकार प्राध्यापक सुनील डेळेकर यांनी आपल्या प्रास्ताविकात व्यक्त केली. यावेळी कॉम्रेड बबन बारदेस्कर, मुरगुड नगराध्यक्ष राजेखान जमादार, ज्योतीराम सूर्यवंशी, विकास पाटील, सुहास खराडे, विक्रम पाटील, सोमनाथ एरनाळकर, सरपंच अमित पाटील, जयवंत पाटील, नितीन खराडे, रणजित सुर्यवंशी, दिग्विजय पाटील, विजय गुरव (सरपंच आदमापुर), दत्ता पाटील (केनवडे), डॉक्टर सुभाष हिंगणे यांनी मनोगते व्यक्त केली पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल पाटील यांनी आभार मानले.
जनतेच्या कल्याणासाठी झटणाऱ्या पत्रकारांना सलाम पत्रकार हे नेहमीच आपल्या जीवाची पर्वा न करता झटत असतात.पण पत्रकारांच्या सुख दुखाकडे लक्ष देत नाहीत.मात्र पत्रकार मंडळी घेतला वसा टाकणार नाही असे म्हणून झटत असतात.अशाच प्रकारे मुरगुड शहर पत्रकार संघाने नागरिकांच्या व्यथा सोडवण्यासाठी आज आंदोलन पुकारले व या आंदोलनाला अखेर तात्पुरते का असेना यश मिळाले. हे पाहून जनतेच्या कल्याणासाठी अहोरात्र झगडणाऱ्या व लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकार बांधवांना जनतेच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ येत असेल तर लोकप्रतिनिधी झोपा काढत आहेत का? असा संतप्त सवाल नागरिकांच्यातून विचारला जात आहे.तर पत्रकारांच्या या कार्याला परिसरातील जनतेतून सलाम करतो असे बोलले जात आहे.