एक जानेवारीपासून कामगारांना वेजबोर्डही लागू करणार….
कारखान्याच्या सातव्या गळीत हंगामाचा मोठ्या उत्साहात शुभारंभ….
सेनापती कापशी दि: १९: सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याची एकरकमी एफआरपी २,९६० रुपये देणार असल्याची घोषणा कारखान्याचे संस्थापक व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. कारखान्याच्या कामगारांना येत्या एक जानेवारीपासून वेजबोर्डही लागू करणार असल्याची घोषणा त्यांनी केली.
कारखान्याच्या सातव्या गळीत हंगाम शुभारंभात मंत्री श्री. मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी बिद्री कारखान्याचे ज्येष्ठ संचालक गणपतराव फराकटे होते. भाषणात मंत्री श्री मुश्रीफ पुढे म्हणाले, एकरकमी एफआरपी देणे ही शेतकऱ्यावर मेहरबानी नव्हे तर आमचे आद्य कर्तव्यच आहे. त्यामुळे, कोणीही टिमकी वाजवण्याची गरज नाही. आंबेओहळ प्रकल्प पूर्ण झाला आहे. लवकरच नागणवाडी प्रकल्पही पूर्ण होईल. त्यानंतर कारखाना कार्यक्षेत्रातच हक्काचा ऊस पिकेल. त्यामुळे, येत्या एक-दोन वर्षातच गाळप क्षमता दहा लाख टन, पन्नास मेगावॅट वीजनिर्मिती व दररोज एक लाख लिटर इथेनॉल निर्मिती अशी विस्तार वाढ करणारच.
या हंगामात नऊ लाख टन ऊस गाळपासह ११ कोटी युनिट वीजनिर्मिती, सव्वा कोटी लिटर इथेनॉल व ५० लाख लिटर रेक्टिफाईड स्पिरिट अशी उद्दिष्टे असल्याचेही ते म्हणाले.
केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने म्हणाले, सात वर्षापूर्वी हा कारखाना बाल हनुमान असतानाही प्रस्थापित साखर कारखान्यांच्या बरोबरीने दर आणि शेतकऱ्यांना सोयीसुविधा दिल्या आहेत. आज हा बाल हनुमान सात वर्षांचा झाला आहे. साखर कारखानदारी समोरील आव्हानांचा द्रोणागिरी पर्वत उचलायची ताकद आणि क्षमता या हनुमानात आहे. भाजप सरकारच्या काळात देशात महागाई गगनाला भिडली आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारला जाब विचारण्याची वेळ आली आहे.
कारखान्याचे कर्मचारी संजय मारुती पाटील रा.भडगाव यांनी एक महिन्याचा पगार मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या न्यायालयीन दाव्याच्या खर्चासाठी दिला.
श्री. मुश्रीफ म्हणाले, देशात गेल्या पाच-सहा वर्षात साखर कारखानदारीचे अक्षरशा कंबरडे मोडले आहे. गेल्या आठवड्यातच शेतकरी संघटनेचे प्रमुख नेते प्रा. जालिंदर पाटील, सावकर मादनाईक तसेच इतर प्रमुख मंडळी मला काही कामानिमित्त भेटण्यासाठी आले होते. मी त्यांना म्हणालो होतो, कोल्हापूर जिल्हा सोडून राज्यात सर्वत्र तीन टप्प्यात एफआरपी दिली जाते. ते सगळे कारखाने कर्जमुक्त झालेत. परंतु; शिरोळमधील चार कारखाने तिथे जाऊन तुम्ही बंद पाडता. त्यामुळे ते एकरकमी देतात. त्यामुळे जिल्ह्याला एक रकमी एफआरपी द्यावीच लागते. तसेच, अशा परिस्थितीत मी त्यांना आवाहन केले, की कोणीही व्यक्तिगत घेऊ नका. परंतु; एक कर्ज नसलेला साखर कारखाना भाड्याने घ्या, तो आदर्शवत चालवा. तुमच्या पावलावर पाऊल टाकून आम्ही साखर कारखानदारी चालवू.
श्री. दत्त महाराज व जनता समर्थ
श्री मुश्रीफ म्हणाले, स्वतःच्या हक्काचा कारखाना व्हावा, ही शेतकऱ्यांची भावना होती. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संकटांचा सामना करीत या कारखान्याची उभारणी केली. आठ वर्षांपूर्वी दत्त जयंती दिवशीच उच्च न्यायालयाने निकाल दिला आणि स्थगिती उठून कारखाना सुरू झाला. त्या भावनेतूनच कार्यस्थळावर श्री. दत्त मंदिर बांधले. भविष्यातही कारखान्यावर आणि माझ्यावर येणाऱ्या सर्वच संकटाच्या निवारणासाठी श्री. दत्त महाराज आणि माझी जनता समर्थ आहेत.
“संजयबाबांना उतारवयातही त्रास……..”
बिद्रीचे संचालक प्रवीणसिंह भोसले म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यात सगळेच साखर कारखाने एकरकमी एफआरपी देत आहेत. मग, शाहूने एकरकमी एफआरपी दिल्याचा एवढा डांगोरा पिटण्याची काय गरज? माजी आमदार संजयबाबा घाटगे यांच्या अन्नपूर्णा साखर कारखान्याला शेतकऱ्यांचा मिळत असलेला प्रतिसाद पाहून, ऊस तिकडे जातोय या भीतीने हा गवगवा समरजीत घाटगे करीत आहेत, अशा चर्चा लोकात सुरू आहेत. अशा पद्धतीने संजयबाबा घाटगे यांना उतारवयातही ते त्रास देत आहेत. पाच वर्षापूर्वी शेतकरी संघटनेने गाळप बंदची हाक दिली असताना नंग्या तलवारी आणि बंदुका घेऊन ऊस कारखान्यापर्यंत आणून गाळप करणारा हाच शाहू कारखाना होता, अशी आठवणही त्यांनी यावेळी करून दिली. त्यावेळी शेतकऱ्यांबद्दलचे प्रेम कुठे गेले होते? असा सवालही त्यांनी केला.
व्यासपीठावर ज्येष्ठ जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील, जिल्हा परिषद सदस्य सतीश पाटील, जिल्हा परिषद सदस्य मनोजभाऊ फराकटे, माजी उपसभापती शशिकांत खोत, बिद्रीचे संचालक प्रवीणसिंह भोसले, विकास पाटील, सूर्याजी घोरपडे, पंचायत समिती सदस्य जयदीप पोवार, डी.एम.चौगुले, बिद्रीचे संचालक जगदीश पाटील, निलेश शिंदे, रवी परीट, नेताजी मोरे, दिनकरराव कोतेकर, रणजीत सूर्यवंशी, प्रा. डी. डी चौगुले, बाळासाहेब तुरंबे, शिरीष देसाई, मारुतराव घोरपडे, नारायण पाटील, दत्ता पाटील आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
स्वागतपर भाषणात अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी कारखान्याच्या गेल्या सहा हंगामाच्या यशस्वी वाटचालीचा सविस्तर आढावा घेतला. प्रास्ताविक जनरल मॅनेजर संजय घाटगे यांनी केले. सूत्रसंचलन विशाल बेलवळेकर यांनी केले. आभार डिस्टिलरी मॅनेजर संतोष मोरबाळे यांनी मानले.