“मुरगूडच्या युवकांनी जपली सामाजिक बांधिलकी “
मुरगूड (शशी दरेकर) : कुरणी येथील श्री हालसिद्धनाथ देवाची यात्रा नुकतीच मोठ्या उत्साहात पार पडली. यात्रेला लाखो भाविकांनी उपस्थिती लावत दर्शन घेतले. मात्र, यात्रेनंतर मंदिर परिसरात भाविक आणि विक्रेत्यांकडून मोठ्या प्रमाणात कचरा साचला होता. हा परिसर स्वच्छ करण्याचे आवाहन शिवभक्त मुरगूडकर यांच्या वतीने करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत मुरगूड येथील शिवभक्त आणि युवकांनी एकत्र येत मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबवली.
शनिवारी पहाटे ५.३० वाजता सुरू झालेली ही स्वच्छता मोहीम सकाळी ९ वाजेपर्यंत सलग चार तास सुरू होती. हातात झाडू, खराटे घेऊन युवकांनी मंदिराचा सभोवतालचा परिसर, मंदिराच्या दोन्ही बाजू, गावाकडे जाणारा रस्ता तसेच मंदिराच्या अंतर्गत भागाची स्वच्छता केली. या मोहिमेत तब्बल चार ट्रॉली कचरा संकलित करण्यात आला. त्याची योग्य विल्हेवाटही लावण्यात आली.

या मोहिमेचे विशेष आकर्षण ठरला तो बाल शिवभक्त समर्थ येरनाळकर. सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ येरनाळकर यांचा चिमुकला समर्थ गेल्या स्वच्छता मोहिमेपासून सातत्याने सहभागी होत असून, यावेळीही त्याने स्वच्छतेसाठी आपला खारीचा वाटा उचलला. त्याच्या या सामाजिक जाणिवेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
यावेळी भाकणूककार गुरुमाऊली कृष्णात डोणे महाराज आणि पुजारी विनायकराव पाटील यांच्या वतीने सहभागी शिवभक्तांना श्रीफळ (नारळ) व प्रसाद देऊन सत्कार करण्यात आला व सेवेचा आशीर्वाद देण्यात आला.

या स्वच्छता मोहिमेत सामाजिक कार्यकर्ते सर्जेराव भाट, सोमनाथ येरनाळकर, ओंकार पोतदार, तानाजी भराडे, शिवाजी चौगले, आनंदा रामाने, प्रफुल्ल कांबळे, अमोल मेटकर, धनंजय सूर्यवंशी, संकेत शहा, रघुनाथ बोडके, अक्षय पोतदार, नामदेव भराडे, बाळासो भराडे, संभाजी भराडे, आनंदा मोरे, विवेक कुंभार, जगदीश गुरव रणजीत मोहिते, कुणाल क्षीरसागर, वेदांत मंडलिक, एकनाथ भराडे, केरबा भराडे, अनिल प्रभावळे यांच्यासह मुरगूडमधील अनेक युवक सहभागी झाले होते.