नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा निर्णय
कागल (प्रतिनिधी): ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या येथील श्री गहिनीनाथ गैबीपीर उरूस यंदा ११ ते १६ नोव्हेंबरदरम्यान विविध धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्याचा निर्णय नियोजन बैठकीत घेण्यात आला. तसेच नागरिक, भाविक व व्यापाऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजनबद्ध पद्धतीने निश्चित करण्यात आले.
शाहू नगर वाचनालयाच्या सभागृहात आयोजित या नियोजन बैठकीच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सविता माते होत्या. उपनगराध्यक्ष जयवंत रावण, उरूस कमिटीचे अध्यक्ष रणजित पाटील यांच्यासह विविध पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

१४ नोव्हेंबर उरुसाचा मुख्य दिवस
उरुसाच्या कार्यक्रमाची रूपरेषा पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आली आहे:
९ नोव्हेंबर: रोजी पूज्य नलवडे यांच्या शुभहस्ते सकाळी दरगात कावडी बांधण्यात येईल.
९ नोव्हेंबर: रोजी रात्री वेस दरवाजावर ढोल व सनईचा गजर होईल.
१० नोव्हेंबर: रोजी वाद्यांच्या गजरात धुना लेपन व गंधरात्र होईल.
११ नोव्हेंबर: रोजी पहिला गलेफ.
१२ नोव्हेंबर: रोजी दुसरा गलेफ.
१३ नोव्हेंबर: रोजी तिसरा गलेफ.
१४ नोव्हेंबर (मुख्य दिवस): चौथा म्हणजेच मोठा गलेफ अर्पण केला जाईल.
१५ नोव्हेंबर: अलोखा गलेफ होईल.
१६ नोव्हेंबर: सुभ्यांच्या वेळी कावडी सोडून उरुसाची सांगता होणार आहे.
व्यापाऱ्यांसाठी शिस्त व दंडात्मक कारवाई
उरूस काळात जमा-खर्च मांडणे, भाविकांसाठी सोयी-सुविधांचे नियोजन करणे तसेच आपत्कालीन परिस्थिती सांभाळण्यासाठी स्थानिक नगरपालिका व पोलिसांच्या समन्वयाने काम करण्याचे निश्चित करण्यात आले.
बैठकीत नगरसेवकांनी व्यक्त केलेल्या मतांनुसार:
“काही स्थानिक व बाहेरून येणारे व्यापारी अधिक जागेवर अतिक्रमण करतात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी व इतर व्यापाऱ्यांमध्ये नाराजी निर्माण होते. यंदा नियमांचे उल्लंघन करून जागा व्यापणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा ठाम निर्णय प्रशासनाने घेतला आहे.”
या बैठकीस नायब तहसीलदार राजेन्द्र यादव, पोलीस निरीक्षक अजित जाधव, नगराध्यक्ष सविता माने, नगरसेवक, नगरसेविका विविध संस्थांची पदाधिकारी यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.