महायुतीविरोधात बंडाचे निशाण उभारणार!
कागल (प्रतिनिधी): कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे (KDCC) संचालक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) नेते प्रताप (भैया) माने यांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते व मंत्री हसन मुश्रीफ यांना अत्यंत भावूक आणि राजकीयदृष्ट्या वादळी पत्र लिहिले आहे. पुणे पदवीधर मतदारसंघातून महायुतीचे तिकीट न मिळाल्यास आणि भविष्याची वाटचाल लक्षात घेता आपण बंडाचे निशाण उभारणार असल्याचे माने यांनी या पत्रात स्पष्ट केले आहे.
पत्रातील महत्त्वाचे मुद्दे:
दोन पिढ्यांचे ऋणानुबंध: “तुमचा आणि माझ्या घराण्याचा ऋणानुबंध गेल्या दोन पिढ्यांचा आहे. आपण दोघेही एकमेकांच्या सार्वजनिक जीवनातील चढ-उतारांचे प्रत्यक्ष साक्षीदार आहोत. पण हा ऋणानुबंध आज तुटणार, या विचाराने अंतःकरणात वेदना होत आहेत,” असे प्रताप माने यांनी म्हटले आहे.

अश्वमेधाचा घोडा मैदानात सोडला: “मला आमदार करण्यासाठी आपणच अश्वमेधाचा घोडा मैदानात सोडलात. गेल्या निवडणुकीतील माघारीपासून मी पुणे पदवीधर मतदारसंघातील पाचही जिल्ह्यांमध्ये फिरत असून पदवीधरांची प्रभावी नोंदणी केली आहे. तुमच्या आशीर्वादाने तिकीट मिळेल असा ठाम विश्वास होता, पण त्याला तडे गेले आहेत,” असा उद्वेग त्यांनी व्यक्त केला.
बंडखोरीचा इशारा: “माझे भविष्य मला अंधारमय करायचे नाही. ज्या कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी जिवाचे रान केले, त्यांच्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही. त्यामुळे मला बंडाचे निशाण रोवावेच लागेल, याशिवाय आता पर्याय उरलेला नाही,” असे त्यांनी स्पष्ट शब्दांत लिहिले आहे.
अजितदादांच्या आठवणीने भावूक: पत्राच्या शेवटी त्यांनी स्वर्गीय अजितदादा पवार यांची आठवण काढत लिहिले, “आज दादा असते तर ही ताटातुटीची वेळ आली नसती. दादांनीच माझी उमेदवारी जाहीर केली होती. नियतीने त्यांना आपल्यातून हिरावून नेल्याने आपण सगळे पोरके झालो आहोत. काश… अजितदादा होते तो ये नौबत नही आती…!”
प्रताप माने यांनी थेट हसन मुश्रीफ यांनाच आव्हान देण्याची आणि अपक्ष/बंडखोरीची तयारी दर्शविल्यामुळे कोल्हापूर आणि पुणे पदवीधर मतदारसंघाच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. महायुतीतील जागावाटपाचा तिढा आणि स्थानिक नेत्यांची नाराजी या पत्राच्या निमित्ताने पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.