महायुतीमध्ये बंडखोरी! भाजपला जागा फिक्स होताच मुश्रीफांचा सेनापती निसटला
कोल्हापूर : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ महायुतीत भारतीय जनता पक्षाकडेच (भाजपा) राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपने या जागेवरील आपला दावा सोडलेला नाही. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून (अजित पवार गट) निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेले प्रताप माने उर्फ भैय्या माने यांनी बंडखोरी करत स्वबळावर अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
भैय्या माने यांचा निर्णय: “माझ्या राजकीय भविष्याच्या आड कुणी येऊ नये,” असे सांगत भैय्या माने यांनी पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचे जाहीर केले आहे. त्यांनी पदवीधर नोंदणीत मोठे काम केले असून दौरेही सुरू केले आहेत.

हसन मुश्रीफ यांची भूमिका: मंत्री हसन मुश्रीफ यांनी भैय्या माने यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते ऐकण्याच्या मनःस्थितीत नसल्याचे सांगत मुश्रीफ म्हणाले, “महायुतीचा धर्म पाळत मला भाजपसोबत राहावे लागेल. त्यामुळे आजपासून माझा आणि भैय्या माने यांचा राजकीय संबंध संपला आहे.”
भाजपला जागा सुटल्याने महायुतीत पुणे पदवीधर मतदारसंघात ही मोठी बंडखोरी मानली जात आहे.