कागल (प्रतिनिधी): एसटी बस स्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिला प्रवाशांचे दागिने चोरणाऱ्या एका महिलेला कागल पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत ताब्यात घेतले आहे. संशयित महिलेकडून सुमारे ५ लाख ५० हजार रुपये किमतीचे ४० ग्रॅम (४ तोळे) सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
प्रेरणा ऋतिक सकट असे अटक करण्यात आलेल्या संशयित महिलेचे नाव आहे. एसटी बसमध्ये चढताना झालेल्या गर्दीचा फायदा घेऊन तिने एका महिला फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याची साखळी (चैन) आणि मंगळसूत्र लांबवले होते. याप्रकरणी कागल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचा तपास सुरू असताना, ही महिला चोरीचे सोने विक्री करण्यासाठी अनंत रो-हाउस, कागल येथे येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ सापळा रचून संशयित महिलेला ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान तिच्याकडून ४ तोळे सोन्याचे दागिने मिळून आले, ज्यामध्ये सोन्याची साखळी, मंगळसूत्र आणि इतर दागिन्यांचा समावेश आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत पाटील, सहाय्यक फौजदार माने, तसेच पोलीस अंमलदार बालाजी पाटील, युवराज पाटील, प्रदीप पाटील आणि जाफर कुर्णे यांच्या पथकाने केली.