कोल्हापूर (प्रतिनिधी) : “भारत देशाला स्वतःच्या शारीरिक कष्टाने घडविणाऱ्या इतर मागासवर्गीय प्रवर्गातील जातींची नोंद करण्यासाठी भारतीय संविधानाच्या कलम ३४० सालीनुसार ओबीसी असा स्वतंत्र रकाना करून फेब्रुवारी २०२७ मध्ये होणाऱ्या जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यात ओबीसी जातींची स्वतंत्र नोंद ओबीसी रकाना करून करावी.” या मागणीसाठी ओबीसींनी आता नाही तर कधी नाही हा लढा लढला पाहिजे यासाठी ११ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर कोल्हापूर जिल्ह्यातील ओबीसींची निदर्शने आयोजित केले आहेत. या निदर्शनामध्ये जिल्ह्यातील ओबीसी जातीसमूहातील माता-भगिनी बांधव यांनी हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन ओबीसी जनम मोर्चाचे सरचिटणीस दिगंबर लोहार यांनी केले.
यावेळी ओबीसी जनमोर्चाचे राज्य सचिव सयाजी झुंजार यांनी “भारतीय संविधानाने ओबीसींना दिलेले न्याय हक्क याबाबत ओबीसींच्यात व्यापक जनजागृती करण्यासाठी ऑक्टोबर महिन्यामध्ये ग्रामीण भागाचे दौरे करण्याचे जाहीर केले. प्रत्येक गावामध्ये ओबीसींच्या सभा आयोजित करण्यात येणार आहेत. त्यासाठी ओबीसी बांधवांनी जाती समूहांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.

इंजिनीयर प्रशांत हावळ यांनी जातींची नोंद म्हणजेच प्रगतीची सुरुवात असल्याचे प्रतिपादन केले. शितल मंडपे यांनी ओबीसी जातींची स्वतंत्र नोंद केल्याशिवाय ओबीसींना शासकीय मदत मिळणार नाही असे मत त्यांनी मांडले. बाळासाहेब लोहार यांनी ग्रामीण भागात व्यापक जनजागृती करण्याची गरज प्रतिपादन केली.याच प्रश्नावर सध्या कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालया समोर सुरू असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनात ओबीसींनी दररोज सहभागी व्हावे असे आवाहन महेश बावडेकर यांनी केले.
देवांग कोष्टी समाजाच्या चौंडेश्वरी मंदिर सभागृहात आज झालेल्या ओबीसी जनमोर्चाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मोहन हजारे होते. सदरच्या बैठकीत सर्वश्री चंद्रकांत कोवळे, तानाजी मर्दाने, विजय मांडरेकर, राजू रसाळ, अनिल खडके, सचिन सुतार, सुनील महाडेश्वर, सुखदेव सुतार जहांगीर आत्तार, संजय सुतार, प्रदीप ओतारी, संजय काटकर आदींचे ओबीसी बांधव सहभागी झाले होते. सुरुवातीला स्वागत करवीर तालुका अध्यक्ष पंडित परीट यांनी केले तर जिल्हाध्यक्ष एकनाथ कुंभार यांनी आभार मानले.