धाराशिव येथे पीआयबीच्या ‘वार्तालाप’ कार्यशाळेचे आयोजन
धाराशिव:
शाश्वत आणि सर्वसमावेशक कृषी पद्धतींच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे शक्य असून, धाराशिवसारख्या आकांक्षित जिल्ह्यांच्या विकासात माध्यमांची भूमिका अत्यंत निर्णायक आहे, असे प्रतिपादन धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्तीकिरण पुजार यांनी केले.
केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत कार्यरत असलेल्या पत्र सूचना कार्यालय (PIB), मुंबईच्या वतीने धाराशिव येथे पत्रकारांसाठी ‘वार्तालाप’ या माध्यम कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ‘आकांक्षित जिल्ह्यांसाठी शाश्वत शेतीचे सुलभीकरण’ या प्रमुख संकल्पनेवर ही कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हाधिकारी कीर्तीकिरण पुजार आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर यांच्या हस्ते करण्यात आले.

शेतीसोबतच कुक्कुटपालन, शेळीपालन आणि मधुमक्षिका पालन यांसारखे शेतीपूरक व्यवसाय स्वीकारल्यास शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात लक्षणीय वाढ होऊ शकते.
माध्यमांनी शेतीविषयक आधुनिक तंत्रज्ञान व सरकारी योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. शेतीतील यशकथा (Success Stories) समोर आणल्यास समाजाचा शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल.
निती आयोगाच्या आकांक्षित जिल्ह्यांच्या यादीत असलेल्या धाराशिव जिल्ह्याचा विकास शाश्वत व सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून वेगाने साधता येऊ शकतो.
कार्यशाळेत कृषी विज्ञान केंद्राचे (KVK) शास्त्रज्ञ डॉ. सचिन सूर्यवंशी यांनी कृषी विस्तार सेवा आणि आधुनिक शेती तंत्रज्ञानाच्या प्रसारात ‘कृषी विज्ञान केंद्राची भूमिका’ या विषयावर माहिती दिली. यासोबतच अणुऊर्जा विभागाचे कृषी क्षेत्रातील योगदान यावरही उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.